सोनसाखळी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात!
By admin | Published: November 18, 2016 02:31 AM2016-11-18T02:31:20+5:302016-11-18T02:31:20+5:30
वाशिम शहर पोलिसांची कारवाई.
वाशिम, दि. १७- नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनासाठी दुचाकीने जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने ६ सप्टेंबरला लंपास केले होते. या घटनेतील एका चोरट्याला अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले. या चोरट्याला १९ नोव्हेंबरपर्यंंंंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
स्थानिक सिव्हिल लाइन परिसरात वास्तव्यास असलेल्या भारती सुरेश मिटकरी या नवरात्रामध्ये देवाळा येथील देवीच्या दर्शनासाठी दुचाकीने जात होत्या. यादरम्यान हिंगोली मार्गावरीला पाण्याच्या टाकीजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केले. मिटकरी यांनी या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविचे कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव, जमादार मनोहर अष्टोनकर, सिद्धार्थ राऊत, सतीश गुडदे, अमोल गिर्हे यांच्या पथकाने तपास केला. या तपासामध्ये सीसीच्या फुटेजवरून आरोपीपर्यंंंंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी वाशिम येथील आरोपी बाळू येलप्पा गायकवाड (रा. गवळीपुरा) याला अटक करण्यात आली. गायकवाड याच्यासोबत आणखी एक आरोपी होता. दुसरा आरोपी सध्या पसार असून त्याचा तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.