करडई पेरा, ‘डीबीटी’द्वारे एकरी तीन हजार मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:44 AM2021-09-18T04:44:17+5:302021-09-18T04:44:17+5:30
वाशिम : तेलबिया उत्पादन, प्रक्रिया व विक्री प्रकल्पांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), डॉ. पंजाबराव देशमुख ...
वाशिम : तेलबिया उत्पादन, प्रक्रिया व विक्री प्रकल्पांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि वाशिम कृषी विभागाच्या समन्वयातून आगामी रब्बी हंगामात जिल्ह्यात करडईचा पेरा किमान पाच हजार एकरापर्यंत करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. करडई लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरुपात प्रती एकर तीन हजार रुपयांचा लाभ ‘डीबीटी’द्वारे दिला जाणार असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी तथा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी केले.
इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी), भटक्या व विमुक्त जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार असून त्यांचे नावे जमीन असणे आवश्यक आहे. आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे देखील गरजेची आहेत. अर्जदार शेतकरी हा आत्मा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य असावा. अर्जदार शेतकऱ्याने किमान एक एकर क्षेत्रावर पेरणी करणे आवश्यक आहे, त्याची कमाल मर्यादा नाही. इच्छुकांनी ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन तोटावार यांनी केले.
....................
बाॅक्स :
उत्पादित माल खरेदी करण्याचीही हमी
या योजनेमध्ये सहभागी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये प्रती एकर निविष्ठा मिळणार आहे. उत्पादित करडई शासकीय हमी भाव ५ हजार ३५० रुपये याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत खरेदी करण्याची हमी राहील. करडईवर प्रक्रिया करून तेल विक्रीतून होणारा नफा प्रमाणात लाभांश ‘डीबीटी’द्वारे दिला जाईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी ‘आत्मा’चे प्रकल्प समन्वयक मनीष बोरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.