वाशिम जिल्ह्यात पेरणीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 04:17 PM2020-06-13T16:17:47+5:302020-06-13T16:18:10+5:30
रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर तालुक्यातील अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केल्याचे शुक्रवार, शनिवारी दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत तीन दिवसांत झालेल्या पावसाच्या भरवशावर रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर तालुक्यातील अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केल्याचे शुक्रवार, शनिवारी दिसून आले. जेथे जमिनीत ४ इंच ओलावा आहे, तेथील शेतकºयांनीच पेरणी करावी, उर्वरीत शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने १३ जून रोजी दिला.
१० जूनपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस पडत आहे. १३ जून रोजी पावसाने उघडीप दिल्याने शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. मानोरा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरीत पाचही तालुक्यात बºयापैकी पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. गतवर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख ९५ हजार ३९ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली होती. त्यात सर्वाधिक २ लाख ९२ हजार ५९ हेक्टरवर सोयाबिनचा पेरा होता. गतवर्षी पावसात सातत्य नसल्याने खरीप हंगामात शेतकºयांना समाधानकारक उत्पन्न घेता आले नाही. गतवर्षी कसर भरून काढण्यासाठी यावर्षी शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहेत. जेथे जमिनीत ४ इंच ओलावा आहे, तेथे शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केल्याचे दिसून येते. विशेषत: मालेगाव, मंगरूळपीर, रिसोड तालुक्यात अधिक प्रमाणात पेरणीला सुरूवात झाली आहे. यावर्षी चार लाख ६ हजार २३४ हेक्टरवर पेरणी होईल तसेच सोयाबीनचा पेरा वाढेल अशी शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
मानोरा तालुक्यात सर्वात कमी पाऊस
गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६.१२ मीमी पाऊस झाला. आतापर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर मानोरा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. १ ते १३ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७५ मीमी पाऊस झाला. यामध्ये वाशिम तालुक्यात ६३.६७ मीमी, रिसोड तालुक्यात ८६.०२ मीमी, मालेगाव तालुक्यात १०४.५४ मीमी, मंगरूळपीर ९६.९९ मीमी, मानोरा ३१.७८ मीमी, कारंजा तालुक्यात ७०.२६ मीमी पाऊस झाला.