पिकांवर नांगर फिरविणाऱ्यांनी केली दुबार पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:37 AM2017-07-18T00:37:48+5:302017-07-18T00:37:48+5:30
शासन धोरणाबाबत रोष: कालावधीच्या अखेरच्या टप्प्यात सोयाबीनवर भर
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : पावसाअभावी इरळा येथील उमेश बालकिसन लाहोटी या शेतकऱ्यासह आठ ते दहा शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिके निघालेच नाही. त्यामुळे जवळपास १०० एकर शेतात काही प्रमाणात निघालेली पिके शेतकऱ्यांनी नांगर फिरवून पिक नष्ट केले होते. अखेर यातील तीन शेतकऱ्यांनी सोमवारी शेतात दुबार पेरणी केली, तर इतरांनीही पेरणीला प्रारंभ केला.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मालेगाव तालुक्यातील इरळासह इतर अनेक भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. इरळा येथे यंदा सुरुवातीपासूनच खूपा कमी पाऊस आहे. अनेक शेतकऱ्यांनी वेळ जाऊ नये म्हणून पावसाच्या आशेवर खरिपाची पेरणी केली; परंतु या भागात पाऊसच पडला नसल्याने पिकांची स्थिती अतिशय वाईट झाली. त्यात उमेश बालकिसन लाहोटी यांच्या १० एकर शेतात. पवन नंदकिशोर लाहोटी यांच्या १० व बालविकास लाहोटी यांच्या ५ एकर शेतात पेरणी केलेले सोयाबीन पिक काही ठिकाणी निघाले तर काही ठिकाणी निघालेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या २५ एकर शेतातील पिकेट ट्रॅक्टर चालवून तोडली आहे. अशीच परिस्थिती या गावातील डिगांबर, रामेश्वर अवचार, गुलाब ठाकरे, भगवान सखाराम ठाकरे, सत्य नारायण लाहोटी, विजय लाहोटी, सागर लाहोटी, या शेतकऱ्यांवरही ओढवली होती. या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिक कमी प्रमाणात निघाल्याने मोडल्याशिवाय गत्यावर नाही. पावसाअभावी पेरलेली पिके निघाली नाही. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा करून निराश झालेल्या या शेतकऱ्यांनी शेतात नांगर फिरवून ही पिके नष्ट करीत जमीन साफ केली. त्यानंतरही दोन चार दिवस पाऊस न पडल्यामुळे पेरणीची वेळ निघून जात असल्याने हे शेतकरी चिंताग्रस्त होते. पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या वेळ निघून जाण्याची स्थिती आली असताना शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पडिक राहण्याची भिती निर्माण झाली होती. या शेतकऱ्यांनी निराशेने पिकांवर नांगर फि रविल्यानंतर उमेश लाहोटीसह काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन आपल्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटाची माहिती शेतकऱ्यांना देत नांगरलेलया पिकांची नोंद करण्याची मागणी केली असता अशा स्थितीचा सर्व्हे करण्याचा शासनाचा आदेश नसल्याचे तहसीलदारांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे. अशा स्थितीत हरळा येथील अनेक शेतकरी हे पावसाअभावी आर्थिक संकटात सापडले आणि या नुकसानीचा शासनाने सर्वे करुन मदत करावी अशी मागणी उमेश लाहोटीसह इतर शेतकऱ्यांनी केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. शासन, प्रशासनाकडून पूर्णपणे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसानंतर सोमवारी आपल्या शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली.
प्रशासनाकडून दिलासा मिळालाच नाही!
अपुऱ्या पावसामुळे पेरलेले निम्म्याहून अधिक बियाणे उगवले नसल्याने उत्पादन होण्याची सूतराम शक्यता नसल्याने इरळा परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची नांगराने मोडणी करून, या संदर्भात तहसीलदारांकडे पाहणी करण्याची आणि नोंद घेण्यासह आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली; परंतु त्यांच्या मागणीचा कोणताही परिणाम झाला नाही. नैसर्गिक आपत्तीचे निकष पुढे करून अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला फेटाळून लावले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच नाही.