पुरेसा पाऊस, बीज प्रक्रियेनंतरच पेरणी करावी -एस. एम. तोटावार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:31 AM2020-06-14T11:31:28+5:302020-06-14T11:32:24+5:30
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सध्या खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. या हंगामाबाबत कृषी विभागाचे नियोजन आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया उपाययोजनांबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...
यंदाच्या हंगामात पेरणीचे नियोजन किती क्षेत्रावर आहे. ?
जिल्ह्यातील खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७०९ हेक्टर आहे, तर गतवर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा त्यात वाढ करून ४ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे.
खरीप पेरणीबाबत शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी ?
सद्यस्थितीत जिल्ह्यात पडत असलेला पाऊस हा अवकाळी पाऊस आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाची अद्याप सुरूवात झाली नाही. प्रथम मान्सून हा गोवामार्गे मुंबई व महाराष्ट्रात पोहचतो शुक्रवारच्या हवामान अंदाजानुसार येत्या २-३ दिवसात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. समाधानकारक पाऊस पडल्यानंतर अथवा ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतर शेतकºयांनी पेरणीस सुरवात करावी.
यांत्रिक पेरणीबाबत काय सांगाल?
गेल्या तीन दिवसांपासून काही भागांत खरीप पेरणी शेतकरी करीत आहेत. यात पेरणी यंत्राच्याबियाण्याच्या बॉक्सपासून निघालेल्या नळया रासायनीक खताच्या खाच्यात व रासायनिक खताच्या बॉक्सपासून निघालेल्या नळया बियाण्याच्या खाच्यात जोडल्या जाताहेत. त्यामुळे पेरणीच्यावेळी बियाणे खाली व खत वर पेरले जात असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारची पेरणी चुकीची असून, सोयाबीनचे बियाणे ५ सेमी पेक्षा जास्त खोलीवर पडते व खत ३ ते ५ सेमी खोलीवर पडते. वास्तविक पाहता पेरणी करीत असताना बियाणे ३ ते ५ सेमी खोलीवर व खते ५ सेमीपेक्षा जास्त खोलीवर पडणे आवश्यक असते. शेतकºयांनी पेरणी करण्यापूवी बियाणे व खताच्या नळया योग्य खाच्यात लावल्याची खात्री करुनच पेरणी करावी.
कृषी विद्यापिठाचा सल्ला महत्त्वाचा?
कृषि विद्यापिठाच्या संदेशानुसार जमिनीत ७५ ते १०० मिमी पाऊस पडून जमिनीतील ओलावा संतृप्त झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा संदेश असला तरी काही शेतकºयांनी कापूस व इतर पिकाच्या पेरणीस सुरूवात केली आहे. बियाणे उगवणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे, त्यासाठी सरासरी ७५ मिमी पाऊस पडणे आवश्यक आहे. ७५ मिमी पेक्षा कमी पावसावर पेरणी केल्यास जमिनीत ओलावा नसल्यामुळे जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेल्या बियाण्याचे कमी प्रमाणात अंकुरण होते.