अल्प पावसावरच पेरणीला प्रारंभ
By admin | Published: June 20, 2016 02:09 AM2016-06-20T02:09:19+5:302016-06-20T02:09:19+5:30
मालेगाव, वाशिम व रिसोड तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा.
वाशिम: मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दांडी मारणार्या पावसाने शुक्रवारपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्हय़ात हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नसतानाही शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केल्याचे दिसून येते. दुबार पेरणी टाळण्यासाठी समाधानकारक पावसानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला. गत काही वर्षांंपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने, बळीराजाला विविध संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर, मानोरा तालुक्याचा अपवाद वगळता अन्य तालुक्यात पावसाने दडी मारली. ११ जून रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हय़ात सर्वत्र पाऊस झाला. १७ जूनपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरण आणि कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने मंगरुळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केल्याचे चित्र आहे. दुबार पेरणीचा धोका टाळण्यासाठी, मान्सूनचा ७५ मिमी पाऊस झाल्यावर किंवा जमिनीत १४ ते १५ सेंमी खोलपर्यंंत ओलावा असेल तर पेरणी करणे अधिक फायदेशीर आहे, असा सल्ला कृषी विभागाने दिलेला आहे. जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी यावर्षी ४.३0 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. मानोरा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित तालुक्यात पावसाने अपेक्षित सरासरी गाठली नाही. रविवारी सायंकाळच्या सुमारास मानोरा, हातना, फुलउमरी व कारखेडा परिसरात जोरदार पाऊस झाला.