सोयाबीनच्या गंजीला आग; पावनेदोन लाखांचे नुकसान
By admin | Published: October 9, 2015 01:38 AM2015-10-09T01:38:40+5:302015-10-09T01:38:40+5:30
कवठा येथील घटना; भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी.
रिसोड : सोयाबीनच्या दोन सुड्यांना आग लागून जवळपास पावणे दोन लाखांचे नुकसान झाल्याच्या दोन घटना तालुक्यातील कवठा खुर्द येथे ७ ऑक्टोबरच्या रात्रीदरम्यान घडल्या. कवठा येथील ज्ञानेश्वर कुंडलिक यांचे चिखली शेतशिवारात गट नं. ८४ मध्ये 0.९५ हे.आर. शेत आहे. या शेतात सोयाबीनची पेरणी केलेली होती. तीन दिवसांपूर्वी सोयाबीन सोंगून एका ठिकाणी गंजी लावली होती. ७ ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान अज्ञात व्यक्तीने सदर गंजीला आग लावली. यामध्ये १८ क्विंटल शेतमालाचे अंदाजे ६६ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी एम.के. जाधव यांनी केला आहे. दुसर्या घटनेत कवठा येथील ज्ञानबा बळीराम देशमाने यांचे चिखली शेतशिवारात गट नं. ८३ मध्ये १.९३ हे.आर. शेत आहे. देशमाने यांनी सोयाबीन सोंगून शेतात गंजी लावली होती. ७ ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने ३0 क्विंटल शेतमालाचे नुकसान झाले. जवळपास १ लाख १0 हजाराचे नुकसान झाल्याचा अहवाल तलाठी जाधव यांनी तहसील कार्यालयाला सादर केला आहे. कवठा येथीलच श्रीधर सरनाईक यांच्या गोठय़ाला शॉटसर्किटमुळे आग लागल्याची घटना ८ ऑक्टोबरला उघडकीस आली. यामध्ये गोठय़ातील ५ जनावरे गंभीर भाजले असून, अन्य साहित्याचे नुकसान झाले आहे. तहसीलदार अमोल कुंभार, जि.प. सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी घटनास्थळी भेट दिली.