सोयाबीनच्या गंजीला आग; साडेसात लाखांचे नुकसान
By admin | Published: October 12, 2015 02:05 AM2015-10-12T02:05:10+5:302015-10-12T02:27:25+5:30
चार शेतक-यांच्या सोयाबीन गंजीला अज्ञात इसमाने आग लावून दिल्याने सात लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान.
कृष्णा (जि. वाशिम): येथील चार शेतकर्यांच्या सोयाबीन गंजीला अज्ञात इसमाने आग लावून दिल्याने सात लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या कृष्णा येथील शेतकरी महादेव देमाजी राऊत यांनी फिर्याद दिली की, यावर्षी कृष्णा शेतशिवारातील शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. दोन दिवसांपूर्वी सोयाबीन सोंगून शेतात सुडी लावली. साडेतीन लाख किंमतीच्या आसपास सोयाबीनपासून उत्पादन होण्याची अपेक्षा राऊत यांना होती. रविवारी सकाळी शेतातील सोयाबीन सुडी आगीने जळून खाक झाल्याचे त्यांना निदर्शनास पडले. दुसर्या घटनेत कृष्णा येथीलच बबन दत्तराव राऊत यांची ८0 हजार रुपये किमतीची गंजी याच दिवशी अज्ञात व्यक्तीने आग लावून नष्ट केली. तिसर्या घटनेत गोविंदा शिवाजी राऊत यांची सत्तर हजार रुपये किमतीची गंजी व शेतकरी मुरलीधर विश्वंभर राऊत यांची दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची सोयाबीन गंजी शेतात होती. अज्ञात इसमाने रविवारला सकाळी आग लावून दिल्याने चारही शेतकर्यांच्या सोयाबीनच्या गंज्या जळून खाक झाल्या. या घटनेत जवळपास सात लाख ५0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अनसिंग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४३५ नुसार गुन्हा दाखल केला.