सोयाबीन शेंगांतून निघताहेत ‘कोंब’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 08:37 PM2017-09-27T20:37:41+5:302017-09-27T20:38:41+5:30
मेडशी : खरीप हंगामातील सोयाबीनच्या हिरव्या झाडांवरील शेंगामधून ‘कोंब’ बाहेर येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या प्रकारासंदर्भात कृषी सहाय्यकदेखील अनभिज्ञ आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी : खरीप हंगामातील सोयाबीनच्या हिरव्या झाडांवरील शेंगामधून ‘कोंब’ बाहेर येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या प्रकारासंदर्भात कृषी सहाय्यकदेखील अनभिज्ञ आहेत.
यंदा मेडशी परिसरात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. खरीप हंगामात मेडशी परिसरात शेतकºयांनी उडीद, मुंग, सोयाबीन, ज्वारी, तूर आदी पिकांची पेरणी केलेली आहे. पावसाने दडी मारल्याने उडीद, मूग पिकाच्या एकरी उत्पादनात घट आली आहे. काहींचा तर पेरणीचा खर्च सुध्दा निघालेला नाही. अशा स्थितीत आता सोयाबीनच्या शेंगांतूनही ‘कोंब’ बाहेर येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. एकामागून एक येणाºया संकटांचा सामना करताना शेतकºयांची दमछाक होत आहे. मूग, उडदाच्या एकरी उत्पादनात प्रचंड प्रमाणातील घट, हमीभावाने नसलेली मूग व उडदाची खरेदी आणि आता सोयाबीनच्या शेंगातून बाहेर निघणारे ‘कोंब’ आदीमुळे शेतकºयांची झोप उडाली आहे. मेडशी येथील बद्रोधीन गवरे, उत्तमराव देशमुख या शेतकºयांसह परिसरातील अनेक शेतकºयांच्या शेतात ३० ते ४० टक्के सोयाबीन झाडावरील शेंगामधून ‘कोंब’ बाहेर आल्याचे दिसून येते. याबाबत कृषी विभागातील कृषी सहाय्यक ढवळे यांना माहिती दिली तसेच हा प्रकार निदर्शनात आणून दिला असता, त्यांनीसुध्दा हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले. हा नेमका काय प्रकार आहे, यासंदर्भातील माहिती वरिष्ठांना दिली जाईल तसेच सोयाबीन शेंगाचे काही नमुने तपासणीसाठी कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांना माहिती दिली जाईल, असे ढवळे यांनी सांगितले. शेंगामधून कोंब बाहेर येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.