वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरात ५०० रुपये तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 12:03 PM2020-12-04T12:03:07+5:302020-12-04T12:03:40+5:30
Washim APMC News वाशिम येथील बाजार समितीत ४,७३० रुपये प्रति क्विंटल, तर कारंजा बाजार समितीत अवघे ४,२५० रुपये दर मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील बाजार समित्यांत सद्य:स्थितीत सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. या शेतमालाचा उठाव असल्याने व्यापारी हमीदरापेक्षा अधिक दरात सोयाबीन खरेदी करीत आहेत. तथापि, प्रत्येक बाजार समितीमधील दरात फरक असून, काही ठिकाणी तब्बल ५०० रुपये तफावत असल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खासगी बाजारांत मिळून दिवसाला एक लाख क्विंटलच्या घरात सोयाबीनची आवक होत आहे. या शेतमालाचा उठाव चांगला असल्याने व्यापाऱ्यांत खरेदीसाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीदरापेक्षा अधिक दर मिळत आहेत. शासनाने सोयाबीनला ३८८० रुपये हमीदर घोषित केले असताना बाजार समित्यांत त्यापेक्षा सरासरी ४०० रुपये अधिक दराने सोयाबीनची खरेदी होत आहे. तथापि, काही बाजार समित्यांचे दर मोठ्या प्रमाणात असताना काही बाजार समित्यांत मात्र अपेक्षेने कमी दर शेतकऱ्यांना मिळत आहेत. वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सोयाबीनला कमाल ४,७३० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले, तर कारंजा बाजार समितीत अवघे ४,२५० रुपये, मंगरूळपीर बाजार समितीत ४,३९० रुपये, रिसोड बाजार समितीत ४,३५० रुपये, तर मानोरा बाजार समितीत ४,५०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळाले. दरातील या तफावतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.ऊनच्या भितीपोटी शेतकऱ्याची घाई
जिल्ह्यासह राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्गाची ही दुसरी लाट असल्याचे सांगितले जात असून, शासन पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे बाजार समित्याही बंद होण्याची भिती असल्याने शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर भर देत आहेत. अगदी रात्रीपासून बाजार समितीसमोरील मार्गावर किलोमीटर अंतरापर्यंत सोयाबीनच्या वाहनांची रांग लागल्याचे चित्र विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे.
बाजार समित्यांत शेतमालाचे दर व्यापारी मनमानी पद्धतीने ठरवितात. वाशिम येथे जर सोयाबीनला ४७३० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असतील, तर इतर बाजार समित्यांत कमी दर क से, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रशासकीय यंत्रणेकडून याची शहनिशा होणे आवश्यक आहे.
-गोपाल आरेकर,
शेतकरी, इंझोरी