सोयाबीनचे दर पुन्हा आठ हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:28 AM2021-07-20T04:28:04+5:302021-07-20T04:28:04+5:30
गतवर्षी सोयाबीन उत्पादक देशांत या शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनची मागणी वाढली. परिणामी सोयाबीनच्या दरात प्रचंड ...
गतवर्षी सोयाबीन उत्पादक देशांत या शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनची मागणी वाढली. परिणामी सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी आली आहे. गत सहा महिन्यांपासून सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे. तीन महिन्यांपूर्वी वाशिम येथील बाजार समितीत सोयाबीनचे दर १० हजार रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले होते. मध्यंतरी या शेतमालाच्या दरात थोडी घसरण होऊन सोयाबीनचे दर प्रती क्विंटल ६८०० ते ७००० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले होते; परंतु आता पुन्हा या शेतमालाच्या दरात तेजी आली असून, सोयाबीनचे दर प्रती क्विंटल आठ हजार रुपयांच्या वर पोहोचले आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोमवारी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेतून हे स्पष्ट झाले आहे.
-------------
वाढत्या दरामुळे शेतकरी समाधानी
बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे. गत काही दिवसांपूर्वी घसरलेले सोयाबीनचे दर आता पुन्हा आठ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. सोयाबीनच्या या वाढत्या दरामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, खरीप हंगामात पीककर्जाला विलंब होत असताना हाती शिल्लक ठेवलेले सोयाबीन विकून शेतकरी शेतामधील निंदण, खुरपणासह खत देण्यासाठी पैशांची व्यवस्था करीत आहेत. त्यामुळे आता बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत आहे.
------------------
मंगरुळपीरमध्ये ८०६५ रुपये प्रती क्विंटल
जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनचे दर सरासरी ७८०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत आहे. मंगरुळपीर येथील बाजार समितीत मात्र सोयाबीनचे दर प्रती क्विंटल ८०६५ रुपयांपर्यंत असून, रिसोड बाजार समितीत ८००० रुपये, कारंजा बाजार समितीत ७९०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. वाशिम, मानोरा आणि मालेगाव बाजार समितीतही सोयाबीनचे दर आठ हजार रुपये प्रती क्विंटलचे दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात मात्र याबाबत आनंद व्यक्त केला जात आहे.
-----------------
बाजार समित्यांमधील सोयाबीनचे दर
तालुका - दर (प्रती क्विंटल)
वाशिम - ७९८०
कारंजा - ७९७०
मं.पीर - ८०६५
रिसोड - ८०००
मानोरा - ७८००