सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:56+5:302021-01-08T06:10:56+5:30
यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनला मागणी आहे. त्यामुळे देशात सर्वत्र सोयाबीनचे दर तेजीत आहेत. वाशिम जिल्ह्यात गत महिन्यात सोयाबीनच्या दराने ...
यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनला मागणी आहे. त्यामुळे देशात सर्वत्र सोयाबीनचे दर तेजीत आहेत. वाशिम जिल्ह्यात गत महिन्यात सोयाबीनच्या दराने ५ हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर मात्र हळूहळू सोयाबीनचे दर घसरू लागले. गत काही दिवसांपासून सोयाबीनचे दर ४३०० ते ४४०० दरम्यान स्थिरावले होते. तथापि, शासनाच्या हमीदरापेक्षा व्यापाऱ्यांकडून ५०० रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विकण्याची लगबग सुरूच होती. दरम्यानच्या काळात रब्बी हंगामात शेतकरी व्यस्त असल्याने बाजारात सोयाबीनच्या आवकीवर परिणाम झाला होता, तर गत आठवड्यात सोयाबीनचे दरही स्थिरच होते; परंतु नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार ४ जानेवारी रोजी सोयाबीनच्या दरात २०० रुपयांपेक्षा अधिक वाढ होऊन सोयाबीनचे दर ४६०० रुपयांच्यावर पोहोचले. सोयाबीनची ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.
----------
तूरही ६ हजारांवर
सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी आली असताना तुरीच्या दरातही तेजी कायमच असून, सोमवारी जिल्ह्यातील प्रत्येकच बाजारात तुरीचे दर प्रति क्विंटल सहा हजारांहून अधिक होते. त्यात मानोरा बाजार समितीत तुरीचे दर थेट ६४०० रुपयांपर्यंत पोहोचले. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिकाधिक ६२४० रुपये प्रति क्विंटल, तर मंगरुळपीर येथील बाजार समितीत ६१०० रुपये प्रती क्विंटल दराने व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली. वाशिम, मालेगाव आणि रिसोड बाजार समितीतही तुरीच्या दरात तेजीच दिसून आली.
-------------
बाजार समित्यांमधील दर
बाजार समिती तूर सोयाबीन
मानोरा ६४०० ४६००
कारंजा ६२३० ४६१०
मं.पीर ६१०० ४६००
रिसोड -- ४५०५
मालेेगाव ---- ४४७०
वाशिम ५९९० ४६२०