परतीच्या पावसाचा सोयाबीनला फटका!
By admin | Published: October 2, 2016 02:29 AM2016-10-02T02:29:32+5:302016-10-02T02:29:32+5:30
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हतबल; सोंगलेल्या सोयाबीनला फुटताहेत ‘कोंब’.
वाशिम, दि. 0१- सलग तीन वर्षे दुष्काळाचा सामना करणार्या शेतकर्यांवरील अस्मानी-सुलतानी संकटांची शृंखला यावर्षीही कायम आहे. मध्यंतरीचा प्रदीर्घ उघाड आणि ऐन सोंगणी हंगामात २९ आणि ३0 सप्टेंबरला झालेल्या परतीच्या पावसाने खरिपातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणार्या सोयाबीनला जबर फटका बसला आहे. सोबतच कपाशी आणि उडीद ही पिकेही धोक्याच्या सावटात सापडली आहेत.
२0१३-१५ या तीन वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वदूर दमदार पाऊस झाला; मात्र त्याचा शेतकर्यांना फायदा होण्याऐवजी अधिकांश प्रमाणात नुकसानच होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून चांगली सुरुवात करणार्या पावसाने मध्यंतरी दीर्घ दडी मारल्यामुळे सोयाबीनसोबतच खरिपातील इतर पिकेही करपायला लागली होती; तर अनेक ठिकाणचे सोयाबीन पिवळे पडले होते.
अशाही स्थितीत तग धरून असलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांनी आर्थिक चणचण भासत असतानाही पैशांची जुळवाजुळव करून सोयाबीनच्या सोंगणीचे काम हाती घेतले. सुमारे २५ टक्के शेतकर्यांनी सोयाबीनच्या सुड्या शेतशिवारांमध्ये रचून ठेवल्या; मात्र २९ व ३0 सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे सोंगलेले सोयाबीन बहुतांशी भिजले असून त्यास ह्यकोंबह्ण फुटत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. यासह उडीद आणि कपाशी या पिकांनाही परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. वातावरणातील असमतोलामुळे कपाशी या पिकावर ह्यमरह्ण रोगाचा प्रादुर्भाव झाला असून ऐन काढणीच्या मोसमात उडीद पिकाला अधिक पावसामुळे नुकसान संभवत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.