गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीनचा पेरा वाढणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:25+5:302021-06-09T04:51:25+5:30
शेलूबाजार : जून महिनाच्या प्रारंभलाच मान्सूनचा आगमन झाल्यामुळे शेतीच्या कामाला गती मिळाली असून, शेतकरी यांनी बी-बियाणे खरेदीबरोबर शेतीची कामे ...
शेलूबाजार : जून महिनाच्या प्रारंभलाच मान्सूनचा आगमन झाल्यामुळे शेतीच्या कामाला गती मिळाली असून, शेतकरी यांनी बी-बियाणे खरेदीबरोबर शेतीची कामे जोमात सुरू केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी परिसरात ६५ ते ७० टक्के सोयाबीनचा पेरा होता, मात्र यंदा ९० टक्के सोयाबीन पेरा वाढणार असून, कोरोना काळात सोयाबीनला मिळालेल्या दरामुळे हा पेरा वाढणार असल्याचे शेतकऱ्यांत बाेलल्या जात आहे. १० टक्क्यांमध्ये तूर, मूग, उडीद आदी पिकांचा समावेश आहे.
जून महिन्यापासूनच पाऊस बरसत असल्याने शेलूबाजार परिसरातील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व शेतातील कामे आटोपण्यावर भर दिला आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळच्या सुमारास शेतातील विविध कामे करण्यावर शेतकरी भर देत आहेत. शेतातील केरकचरा, मातीकाम, वखरणी आदी कामे शेतकरी सध्या करीत आहेत. पावसाचे रोहणी नक्षत्राचे पहिले चरण सुरू आहे. शेतकऱ्यांना गतवर्षी पावसाच्या हुलकावणीला तोंड द्यावे लागले. परिस्थितीवर मात करत शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात पिकाची पेरणी करण्यासाठी तेवढ्याच उमेदीने तयारी करीत आहेत. कोरोना महामारीमुळे शेतजमिनी वगळता इतरत्र कामे नाही. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकरी मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामात स्वत:ला व्यस्त ठेवत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी गतवर्षीपेक्षा यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनपूर्व शेतातील कामे लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस झाल्यास बरेच शेतकरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कृषी केंद्रात खते, बियाणे, कीटकनाशके आदी खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची कृषी केंद्रावर गर्दी कायम आहे. आज रोजी बी-बियाणे तसेच शेतकर्यांच्या मागणीनुसार खते बियाणे उपलब्ध आहेत.