वाशिमच्या बाजारात सोयाबीनला विक्रमी ९४०० रुपयांचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:36+5:302021-06-22T04:27:36+5:30
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत गुंंतला आहे. त्यामुळे या शेतमालाची आवकही बाजार समित्यांत घटत असल्याचे दिसत आहे. तथापि, वाशिमच्या ...
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत गुंंतला आहे. त्यामुळे या शेतमालाची आवकही बाजार समित्यांत घटत असल्याचे दिसत आहे. तथापि, वाशिमच्या बाजारात मात्र गत काही महिन्यांपासून सोयाबीन आणि तुरीसह सर्वच शेतमालाच्या दरात तेजी दिसत असून, सोयाबीनच्या दराने, तर यंदा विक्रमी उच्चांक गाठत ९४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत झेप घेतली आहे. अमेरिका, ब्राझिल, चीनसारख्या देशांकडून सोयाबीनची मागणी वाढल्याने देशांतर्गत सोयाबीनचा उठाव वाढून या शेतमालाचे दर वाढत आहेत. अद्यापही सोयाबीनच्या दरातील तेजी कायम असून, सोमवारी वाशिम बाजारात अधिकाधिक ९४०० रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनची खरेदी झाली, तर मंगरूळपीर बाजार समितीत जवळपास ७८०० रुपये प्रती क्विंटलने सोयाबीनची खरेदी झाली. कारंजा बाजार समितीत मात्र सोमवारी सोयाबीनचे दर प्रति क्विंटल सात हजारांपर्यंतच होते.
--------------------
कारंजा, वाशिममधील दरात २ हजारांची तफावत
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कमालीची तेजी दिसत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घरात राखून ठेवलेले सोयाबीनही बाजारात विकण्यावरच भर दिला. वाशिमच्या बाजारात सोमवार २१ जून रोजी सोयाबीनला प्रती क्विंटल ९४०० रुपये दर मिळाला असताना कारंजा बाजारात या शेतमालाचे दर ७०१० रुपये प्रती क्विंटलच असल्याचे दिसले. अर्थात वाशिम आणि कारंजातील बाजारात सोयाबीनच्या दरात तब्बल २ हजारांची तफावत असल्याचे स्पष्ट झाले.
---------------
बाजार समित्यांमधील सोयाबीनचे दर
तालुका किमान कमाल
वाशिम ६००० ९४००
कारंजा ६५५० ७०१०
मानोरा ६८०० ७४००
मालेगाव ६६०० ७३४०
मं.पीर ६४०० ७८५०
-------------------------