सोयाबीनचे दर साडे तीन हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:55 PM2019-01-12T13:55:12+5:302019-01-12T13:55:41+5:30
वाशिम: सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात कमालीची तेजी आली असून, बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून या शेतमालास ३४०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे शुक्रवारच्या बाजारभावावरून स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात कमालीची तेजी आली असून, बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून या शेतमालास ३४०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे शुक्रवारच्या बाजारभावावरून स्पष्ट झाले आहे. शासनाच्या हमीभावापेक्षा व्यापाºयांकडून अधिक दर मिळत असतानाही बाजारात या शेतमालाची आवक मात्र म्हणावी तेवढी वाढलेली आहे.
वाशिम जिल्ह्यात गतवेळच्या खरीप हंगामात २ लाख ८७ हजारांहून अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती. मध्यंतरी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे या पिकाला फटका बसला तरी बहुतांश शेतकºयांना या पिकाचे चांगले उत्पन्नही झाले. या शेतमालाची काढणी पूर्ण झाल्यानंतर बाजारात खरेदीही सुरू झाली. हंगामाच्या अगदी सुरुवातीपासूनच या शेतमालास चांगले दर मिळत होते. त्यामुळे अद्यापही जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू करणे खरेदीदार संस्थांना शक्य झाले नाही. त्यातच गेल्या आठवड्यापासून या शेतमालाच्या दरात कमालीची तेजी आली आहे. शासनाने सोयाबीनला यंदा ३३९९ रुपये हमीभाव घोषीत केले असताना व्यापाºयांकडून मात्र हमीभावापेक्षा अधिक दराने या शेतमालाची खरेदी करण्यात येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांत या शेतमालाचे दर ३५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यातच मंगरुळपीर बाजार समितीत या शेतामालाची व्यापाºयांकडून कमाल ३५१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली, तर वाशिम बाजार समितीत ३२५० ते ३४६०, कारंजा बाजार समितीत ३२५० ते ३४८५, रिसोड बाजार समितीत ३३९० ते ३४५०, मालेगाव बाजार समितीत ३३५० ते ३४५०आणि मानोरा बाजार समितीत ३२०० ते ३४७० रुपये दराने या शेतमालाची खरेदी झाली. अर्थात प्रत्येकच बाजार समितीत शेतकºयांना शासनाच्या हमीभावापेक्षा अधिक दर व्यापाºयांकडून मिळत असल्याचे दिसत आहे. तथापि, या शेतमालाच्या दरात मोठी वाढ झाली असतानाही आवक मात्र फारशी वाढली नाही. शुक्रवारी कारंजा बाजार समितीत सर्वाधिक ७५०० क्विंटल, तर वाशिम बाजार समितीत २८७६, मंगरुळपीर बाजार समितीत २३०० आणि रिसोड बाजार समितीत २४८९ अशी साधारण आवक पाहायला मिळाली.