वाशिमच्या बाजारात सोयाबीन ५३०० रुपये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:34 AM2021-01-09T04:34:00+5:302021-01-09T04:34:00+5:30
गतवेळच्या खरीप हंगामात जिल्ह्यात २ लाख ८३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. हे पीक काढणीवर ...
गतवेळच्या खरीप हंगामात जिल्ह्यात २ लाख ८३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. हे पीक काढणीवर आले असताना परतीच्या पावसामुळे या पिकाला मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेले सोयाबीन पाण्यात भिजल्याने सोयाबीनचा दर्जाही खालावला. त्यामुळे सुरुवातीला या शेतमालाची अतिशय कमी दरात विक्री शेतकऱ्यांना करावी लागली; परंतु अमेरिका, ब्राझीलसह चीनसारख्या देशाकडून सोयाबीनची मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी आली. याचे परिणाम वाशिम जिल्ह्यातही दिसून आले. साधारण प्रत्येकच बाजार समितीत सोयाबीनची खरेदी ४४०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटलने होत आहे. त्यात वाशिम येथील बाजार समितीत शुक्रवार, ८ जानेवारी रोजी सोयाबीनचे दर तब्बल ५३०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले. एवढ्या उच्च दरात खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीनचे प्रमाण फारसे नव्हते. तथापि, जिल्ह्यात सोयाबीनच्या दरातील हा उच्चांक ठरला आहे.