अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ निर्वाण महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:09 AM2017-08-01T01:09:24+5:302017-08-01T01:10:26+5:30
शिरपूर जैन : येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने २९ जुलै रोजी हर्षोल्लासात श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ यांचा निर्वाण महोत्सव साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने २९ जुलै रोजी हर्षोल्लासात श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ यांचा निर्वाण महोत्सव साजरा करण्यात आला.
महोत्सवाचे औचित्य साधून सकाळी ८ वाजता गावातून श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंतांच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत माताजी, भैयाजी, दीदी व इंद्र, इंद्रायणी, श्रावक, श्राविका सहभागी झाले होते. ही मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने पोलीस स्टेशनसमोरून श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान, पवळी मंदिरात पोहचली. तेथे पूजा-अर्चा झाल्यानंतर परत दिगंबर जैन बस्ती मंदिरमध्ये आली. तेथे श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान यांचा अभिषेक करण्यात आला. तसेच श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ विधान मंडळासाठी संगीतमय पूजन करण्याकरिता श्री पार्श्वनाथ भगवान हे २३ वे तीर्थंकर असल्यामुळे इंद्र, इंद्रायणींच्या जोड्या पूजेला बसविण्यात आल्या होत्या. पार्श्वनाथ विधानमध्ये इंद्र बनण्याचा मान लातूर येथील विजयकुमार कस्तुरे यांनी प्राप्त केला. भगवंताला शांतीधारा करण्याचा मान ऋषिकेश राजेंद्र ढोले; तर भगवंत पार्श्वनाथ यांना प्रथम निर्वाण लाडू चढविण्याचा मान रत्नाकर रोकडे यांनी मिळविला. आर्यिका सन्मती माताजी यावेळी बोलताना म्हणाल्या, की जे हातचे गेले, त्याचा विचार करण्यापेक्षा भविष्याचा विचार करायला हवा. वेळ कुणासाठीच थांबत नाही. त्यामुळे वेळेवर कार्य केले पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर पश्चात्ताप करण्यात काय अर्थ ? जसे दिवा विझल्यानंतर तेल निरर्थक आहे, पीक सुकल्यावर पाणी निरर्थक आहे, अपघात झाल्यावर ब्रेक मारणे निरर्थक आहे, त्याचप्रमाणे वेळ निघून गेल्यानंतर कर्म करणेही निरर्थक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील सर्व श्रावक, श्राविका व परगावहून आलेल्या श्रावकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज व महिला मंडळ, युवा मंच, शिरपूर जैन यांनी केले.