महिला मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी विशेष मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:19 PM2018-06-07T15:19:42+5:302018-06-07T15:19:42+5:30
वाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाशिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. या अंतर्गत महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात विशेष मोहिम राबविली जात असून, जनजागृतीवर भर दिला आहे.

पुरूषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी असल्याने ग्रामीण भागात मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच महिला मतदार संख्या वाढविणे या दुहेरी उद्देशाने शहरासह तालुक्यातील एकूण २० मतदान केंद्रांतर्गत जनजागृती केली जात आहे. वाशिम शहरातील सर्व मतदान केंद्र, कोकलगाव, काजळांबा, पार्डी आसरा, कार्ली, तांदळी शेवई, अनसिंग, जुमडा, शिरपुटी, जयपूर, मोहगव्हाण डुबे, पांडव उमरा व सावरगाव जिरे या मतदान केंद्रांतर्गत नवीन महिला मतदारांची नोंदणी केली जात आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवती व महिलांनी अद्याप मतदार यादीमध्ये नाव नोंदविले नसल्यास या शिबिरादरम्यान नावनोंदणी केली जात आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा वाशिम तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेत नमुना-६ अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर नावनोंदणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार बळवंत अरखराव, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार दीपक दंडे व कर्मचारी या मोहिमेसाठी परिश्रम घेत आहेत.