राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नाेंदणीसाठी विशेष अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:22+5:302021-07-03T04:25:22+5:30
वाशिम : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्वयंरोजगार या घटकांतर्गत वाशिम नगर परिषदेला सन २०२१-२२ चे ...
वाशिम : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्वयंरोजगार या घटकांतर्गत वाशिम नगर परिषदेला सन २०२१-२२ चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अभियानांतर्गत शहरातील पात्र व निवडक वैयक्तिक लाभार्थींचे कर्ज प्रकरण, गट व बचतगटांचे कर्ज प्रकरण बँकांना पाठविण्याकरिता पात्र व इच्छुक लाभार्थींनी विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाशिम नगर परिषदेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) कक्षात अर्ज सादर करण्यात येणार आहेत.
उमेदवारांची निवड टास्क फोर्स समितीमार्फत मुलाखती व कागदपत्रांच्या आधारे केली जाईल. कर्ज प्रकरणात मंजूर लाभार्थींना बँकेच्या एकूण व्याजदरापैकी ७ टक्के व्याजाची रक्कम स्वतः भरावी लागेल, तर ७ टक्के व्याजाची रक्कम एनयूएलएम कक्ष दर तीन महिन्यांना लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करेल. घेतलेले सर्व कर्जाची लाभार्थींना स्वतः परतफेड करावी लागेल. योजनेची माहिती व अर्ज वाशिम नगर परिषद कार्यालयातील एनयूएलएम कक्षात ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत उपलब्ध आहेत. सदर कक्षातील अभियान व्यवस्थापक धम्मपाल पंडित, शहर अभियान व्यवस्थापक धनंजय देशमुख, समुदाय संघटक संगीता कदम, सिंधू पवार यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून नावनोंदणी अर्ज सादर करावेत. शहरातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिम नगर परिषदेचे नगराध्यक्ष अशोक हेडा व मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केले आहे.
............
या व्यक्तींना घेता येईल लाभ
दारिद्र्य रेषेखालील व १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रिया, अल्पसंख्याक, दिव्यांग, घरकामगार, चिंधी वेचणारे, फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम कामगार, सफाई कामगार, गृहउद्योग कामगार, वाहतूक कामगार आदी पात्र व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
...........
ही कागदपत्रे करावी लागणार सादर
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), दोन पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, रहिवासी दाखला, दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, कोटेशन, ना हरकत प्रमाणपत्र, कर पावती, भाडेपावती, संबंधित व्यवसायाचे कौशल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
...........
दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक व १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीसाठी असलेल्या या याेजनेमुळे अनेकांना फायदा हाेऊ शकताे. त्याकरिता जास्तीत जास्त लाभार्थींनी या याेजनेचा लाभ घ्यावा.
- दीपक माेरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम