वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार - सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 08:46 PM2018-02-14T20:46:29+5:302018-02-14T20:47:07+5:30
वाशिम : केंद्र सरकारकडून नीती आयोगामार्फत देशातील ११५ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमासाठी वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्र सरकारकडून नीती आयोगामार्फत देशातील ११५ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमासाठी वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील कृषि, आरोग्य, शिक्षण क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे. जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठीही विशेष प्रयत्न करणे आवश्यक असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणा-या विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
यावेळ वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, वाशिम जिल्ह्याचा विकास होण्यासाठी कृषि क्षेत्राचा विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. याकरिता मृद आरोग्याचा (सॉईल हेल्थ) शास्त्रीय अभ्यास करून क्लस्टर स्वरुपात कोणत्या योजना राबविणे शक्य आहे, याविषयी एकत्रित विकास आराखडा तयार करा. तसेच कृषि यांत्रिकीकरणासाठी विशेष प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी कृषि विभागाला केल्या. तसेच जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी लवकरच जिल्ह्यात स्वतंत्र आढावा बैठक घेणार असल्याचेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
वाशिम येथे नाविण्यपूर्ण योजनेतून पर्यटनाला गती देण्यासाठी प्लॅनेटोरियम, अॅडव्हेंचर पार्क व मोनोरेल उभारणीच्या कामाचे मुनगंटीवार यांनी यावेळी कौतुक केले.
गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजसमधून पाणी उपसा करण्यासाठी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी सुमारे ९५ कोटी रुपये निधी आवश्यक आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्यास वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी मुनगंटीवार यांनी निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
लोणी तीर्थक्षेत्र येथील श्री संत सखाराम महाराज देवस्थान येथे सुरु असलेल्या विकास कामांचाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच ही सर्व कामे मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
वाशिम हा नवीन जिल्हा असून याठिकाणी शासकीय अधिकारी, कर्मचाºयांसाठी पुरेशी निवासस्थाने नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी सांगितले व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. यावेळी मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या. तसेच याकरिता आवश्यक असलेला ८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१७-१८ अंतर्गत झालेला खर्च, सन २०१८-१९ करिता प्रस्तावित नियतव्यय याची माहिती दिली. तसेच विविध यंत्रणांकडून ३०८ कोटी ७३ लक्ष रुपयांची अतिरिक्त मागणी असून सदर निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनीही जिल्हा परिषदेमार्फत जलसंधारण व जनसुविधा निर्मितीच्या कामांसाठी आवश्यक अतिरिक्त निधीच्या मागणीबाबत सादरीकरण केले.