भक्तिधाम येथील दरोडा तपासाला गती
By admin | Published: October 29, 2016 02:32 AM2016-10-29T02:32:32+5:302016-10-29T02:32:32+5:30
पोहरादेवी येथे दहा लाखांचा ऐवज झाला होता चोरी.
मानोरा, दि. २८- तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील भक्तिधाममधील संत सेवालाल महाराजांची हिरेजडित चांदीची पगडी, दोन सिंह मूर्ती तसेच चांदीचा पत्रा असा जवळपास दहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी २६ ऑक्टोबरच्या रात्रीदरम्यान लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली असून, शुक्रवारी बैठक घेतली.
अप्पर पोलीस अधीक्षक सपना गोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी पोहरादेवी परिसरातील पोलीस पाटलांची बैठक घेऊन माहिती जाणून घेतली. श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील पोहरादेवी, उमरी खुर्द भागातील वसंतनगर येथील भक्तिधाम येथे काही अज्ञात चोरट्यांनी चोरी करून या परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती प्राप्त होताच, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पोलीस अधिकार्यांच्या ताफ्यासह पाहणी केली. चोरीच्या दुसर्या दिवशी २८ ऑक्टोबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सपना गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी मानोरा पोलीस स्टेशन येथे त्या भागातील पोलीस पाटील यांना पाचारण करून बैठक घेतली. यावेळी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्यासाठी काही माहिती जाणून घेतली. त्यामुळे या घटनेच्या तपासात गती मिळणार असून, वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथके तपासासाठी रवाना केली आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलीस विभागाने व्यक्त केला.
सीसी कॅमेरे नाही
भक्तिधाम निर्माण करणार्यांनी या ठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी अंदाजे १२ कोटी रुपयांच्या इमारतीसह देवी-देवतांचे सोने, चांदी, रत्नजडित मौल्यवान ऐवज निर्माण केले; मात्र या ठिकाणी सीसी कॅमेरे बसविले नाही. सीसी कॅमेरे बसविले असते तर अज्ञात चोरट्यांचे छायाचित्र कॅमेर्यात कैद झाले असते. सीसी कॅमेरे का बसविले नाही, याबाबत जनतेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.