१५ व्या वित्त आयोगाचा निधी मार्चपर्यंत ९० टक्के खर्च करा; सीईओ वाघमारे यांचे निर्देश

By संतोष वानखडे | Published: May 22, 2024 05:42 PM2024-05-22T17:42:40+5:302024-05-22T17:42:58+5:30

मॅरेथॉन बैठकीत १४४२ कामांचा आढावा

Spend 90 percent of 15th Finance Commission funds by March; Instructions from CEO Waghmare | १५ व्या वित्त आयोगाचा निधी मार्चपर्यंत ९० टक्के खर्च करा; सीईओ वाघमारे यांचे निर्देश

१५ व्या वित्त आयोगाचा निधी मार्चपर्यंत ९० टक्के खर्च करा; सीईओ वाघमारे यांचे निर्देश

वाशिम : जिल्हा परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात २२ मे रोजी पार पडलेल्या मॅरेथॉन बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी तब्बल १४४२ कामांचा आढावा घेतला. १५ व्या वित्त आयोगांतर्गत मागील चार वर्षात प्राप्त झालेल्या एकुण निधीपैकी कमीत कमी ९० टक्के निधी मार्च २०२५ पूर्वी खर्च करण्याचे निर्देश वाघमारे यांनी दिले.

१५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील कामाचा सविस्तर आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे आणि वित्त आयोगाचे प्रमुख तथा डीआरडीएचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी घेतला. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्यासह विभागप्रमुखांची उपस्थिती होती. बैठकीदरम्यान २०२०-२१ पासूनची कामे अपूर्ण असल्याबाबत व खर्च कमी झाल्याबाबत सीईओ वाघमारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त् केली. खर्च कमी का झाला? याबाबत कारणांचा सखोल आढावा त्यांनी यावेळी घेतला.

प्रत्येकाने दर महिन्याला आतापर्यंत प्राप्त झालेल्या निधीच्या सरासरी दहा टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करून अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोणत्याही परिस्थितीत मार्च २०२५ पर्यंत पंधरावा वित्त आयोगाच्या कामावरील मागील चार वर्षात प्राप्त झालेल्या एकुण निधीपैकी कमीत कमी ९० टक्के खर्च झालाच पाहिजे, या अनुषंगाने सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन करून उद्दिष्ट गाठण्याचे निर्देश दिले. यासाठी सर्व गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर झालेल्या कामांचा बाबनीहाय आढावा दर महिन्याला घ्यावा अशा सूचना सीईओ यांनी दिल्या.

विविध कामांचा आढावा
१५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषदेच्या १ हजार ४४२ कामे, पंचायत समिती अंतर्गत २ हजार २२३ आणि ग्राम पंचायत स्तरावर ७३ हजार २९९ कामे मंजुर आहेत. या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या एकुण १ हजार ४४२ कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सकाळी ९ वाजता सुरु झालेली ही मॅरेथॉन बैठक दुपारच्या पाऊण तासाच्या भोजन अवकाशानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सलगपणे चालली.

Web Title: Spend 90 percent of 15th Finance Commission funds by March; Instructions from CEO Waghmare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.