अपंग कायद्यानुसार तीन टक्के निधी खर्च करा!
By admin | Published: July 12, 2017 07:32 PM2017-07-12T19:32:30+5:302017-07-12T19:32:30+5:30
मंगरुळपीर नगराध्यक्षांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम : शासनाच्या २०१३ व २०१५ च्या शासन निर्णयानुसार अपंगाची जन्म मृत्यु नोंद निर्णयाप्रमाणे मंगरुळपीर नगर पालीका क्षेत्रात अपंगाची नोंद करावी अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्यावतीने नगराध्यक्ष डॉ. गजाला यास्मीन मारुफ खान यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर निवेदन देवून करण्यात आली. यावेळी ऍड. मारुफ खान, लेखापाल शशिकांत इंगोले, गणेशपुरे यांची उपस्थिती होती.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासन निर्णयानुसार अपंग प्रमाणपत्र सादर करणार्या अपंगांची नोंदणी करण्यासाठी नोदंणी रजिस्टरमध्ये नोंद घेण्याबाबत शासन परिपत्रकान्वये सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु मंगरुळपीर नगर पालिका क्षेत्रात या परिपत्रकाची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. तरी उपरोक्त शासन निर्णयानुसार सदर परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करुन अपंग बांधवांना न्याय द्यावा. शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपुर्ण सहभाग) अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार अपंग कल्याण कार्यासाठी तसेच वैयक्तिक लाभांच्या योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी ३ टक्के लाभार्थी अपंग असण्याबाबत अपंग कल्याण कृती आराखडा २००१ राबविण्याच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. परंतु मंगरुळपीरमध्ये या शासन निर्णयाची पुरेपुर अंमलबजावणी होतांना दिसत नाही. या शासन निर्णयानुसार अपंगांना शासनाच्या सर्व योजनांमध्ये सामावून घेण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली.
निवेदन देतांना महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व छावाचे विदर्भ संपर्क प्रमुख मनिष डांगे, विदर्भ उपाध्यक्ष केशव कांबळे, महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष केशव कांबळे, विदर्भ सहसचिव गोपाल मोटे, राज्य संचालिका वंदना अक्कर, महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष यमुनाबाई बेलखेडे, तालुका अध्यक्ष विठ्ठल गादेकर, तालुका संपर्कप्रमुख दिलीप इंगोले, तालुका कार्याध्यक्ष काझी नजरुद्दीन काजी कजरुद्दीन, सहसचिव मनोज इंगळे, कोषाध्यक्ष संजय अंबलकर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुजाता लबडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.