टंचाईनिवारणार्थ लाखोंचा खर्च; तरीही दुबळवेल गावात पाणीटंचाई
By Admin | Published: April 4, 2017 03:13 PM2017-04-04T15:13:20+5:302017-04-04T15:13:20+5:30
ग्राम पंचायत सदस्य या नात्याने गावाची पाणी समस्या सोडवू शकत नसल्याने राजीनामा मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांनी केली.
मालेगाव(वाशिम ): पाणीटंचाईवर लाखो रुपये खर्च होऊनही दुबळवेल येथे पाणीटंचाई कायम आहे. पाणीटंचाईची धग कमी होत नसेल, तर आमचे राजीनामे मंजूर करून कार्यमूक्त करा, अशी मागणी दूबळवेलच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने एकच धांदल उडाली.
दुबळवेलचे ग्राम पंचायत सदस्य मोतीराम जयराम नानोटे, गजानन गणपत लबडे व सुशीला सुभाष देवढे यांनी म्हटले की, दुबळवेल ग्रामपंचायत ला कायमस्वरुपी सचिव नाही. दरवर्षी सचिवांच्या बदल्या होत असतात. त्यामुळे नियमाप्रमाणे सभा व ग्रामसभा झाल्या नाहीत. या गावाची पाणीपुरवठा योजना तीन वर्षापासून नादूरूस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठी निधी दिला. यावर्षी पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी १ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. परंतु हे काम २०१८ मध्ये पूर्ण होईल. असे असताना प्रशासनाने सदर गाव पाणीपुरवठा योजनेत घेवुन पाणीपुरवठा करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न झाल्याने गावावर पाणीटंचाईचे सावट आहे. ग्रामस्थांना दोन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत सदस्य या नात्याने गावाची पाणी समस्या सोडवू शकत नसल्याने राजीनामा मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांनी केली.