धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात
By admin | Published: October 13, 2016 01:50 AM2016-10-13T01:50:30+5:302016-10-13T01:50:30+5:30
समतेचा संदेश देत जिल्हाभरातून रॅली काढण्यात आल्यात.
वाशिम, दि. १२- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाशिम शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. समता व शांततेच्या रॅलीद्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते असा संदेश देणार्या तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली इतिहास केला. या घटनेला ६0 वर्षे पूर्ण झाल्याने जिल्ह्यात आंबेडकरी अनुयायी, विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळांच्या वतीने धम्ममय वातावरणात हा सोहळा साजरा केला. स्थानिक नालंदा बुद्ध विहारात विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी सामुहिक बुद्ध वंदना, धम्म वंदना व संघ वंदना घेण्यात आली. त्यानंतर भव्य स्वरुपात मिरवणूक काढण्यात आली. सिव्हिल लाईन मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मिरवणुकीची सांगता करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंबेडकरी अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हजारो अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून महिला व पुरूष मोठय़ा संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. रिसोड, कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा शहरातील धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, रिसोड तालुक्यातील चिखली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याजवळ सकाळी सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. सायंकाळी शांतता रॅली काढण्यात आली. भीम गीत, धम्म प्रश्न मंजूषा यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले.