भारतीय नववर्षानिमित्त निघाली उत्स्फूर्त दुचाकी रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:52 AM2018-03-19T01:52:48+5:302018-03-19T01:52:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: भारतीय नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणापासून होते. या औचित्यावर १८ मार्चला भारतीय नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील श्रीराम मंदिरापासून दुपारी ४ वाजता भव्य दुचाकी शोभायात्रा काढण्यात आली. त्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. याप्रसंगी झालेल्या ‘जय श्रीराम’च्या गजराने संपूर्ण वाशिम नगरी दुमदुमून गेली होती.
वाशिम येथे विहिंप, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती, विश्वमांगल्य व बजरंग दल या सामाजिक संघटनांच्यावतीने भारतीय नववर्षाच्या स्वागतानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही यानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, शोभायात्रेत मोटरसायल व सायकलस्वारांचाही समावेश होता. या शोभायाात्रेला स्थानिक श्रीराम मंदिरापासून प्रारंभ झाला. शोभायात्रेत वाशिम शहरातील माताभगिनी, युवती, युवा व समस्त नागरिक फेटे बांधून सहभागी झाले. विशेष सजविलेल्या रथावर भारतमातेची प्रतिमा, बुलेटस्वार फेटेधारी युवती हे शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. शोभायात्रेचा समारोप ग्राम आराध्य श्री बालाजी मंदिरात झाला.