क्रीडा विभागाचा जलतरण तलाव बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:12 PM2020-11-23T17:12:23+5:302020-11-23T17:12:34+5:30
Washim News जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असली तरी अद्याप हा जलतरण तलाव सुरू होऊ शकला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जानेवारी २०२० मध्ये जिल्हा क्रीडा संकुल परिसरात क्रीडा विभागातर्फे भव्य जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली. सुरूवातीला निविदा प्रक्रिया आणि त्यानंतर कोरोनामुळे हा जलतरण तलाव बंद राहिला. १५ दिवसांपूर्वी जलतरण तलाव सुरू करण्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असली तरी अद्याप हा जलतरण तलाव सुरू होऊ शकला नाही.
क्रीडा विभागाच्यावतीने स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल परिसरात विविध क्रीडा विषयक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना होत आहे. जानेवारी महिन्यात जलतलावाचे कामही पूर्ण झाल्याने खेळाडूंसह शहरवासियांना जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. २५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते या जलतरण तलावाचे लोकार्पणही झाले. त्यानंतर निविदा प्रक्रियेत मार्च महिन्यापर्यंती हा जलतरण तलाव अडकला. एप्रिल महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने जलतरण तलाव सुरू करण्यावर मर्यादा आल्या. नोव्हेंबर महिन्यात अनलॉकच्या टप्प्यात जलतरण तलाव सुरू करण्याला परवानगी मिळाली. तथापि, जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव अद्याप सुरू होऊ शकला नाही. डिसेंबर महिन्यापासून जलतरण तलाव सुरू होईल, असे क्रीडा विभागातर्फे सांगितले जात आहे.