निविदा प्रक्रियेत अडकला क्रीडा विभागाचा जलतरण तलाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 02:50 PM2020-03-06T14:50:30+5:302020-03-06T14:50:38+5:30
जलतरण तलाव सव्वा महिन्यानंतरही प्रत्यक्षात जनसेवेत येऊ शकला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव सव्वा महिन्यानंतरही प्रत्यक्षात जनसेवेत येऊ शकला नाही.
क्रीडा विभागाच्यावतीने स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल परिसरात विविध क्रीडा विषयक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना होत आहे. जानेवारी महिन्यात जलतलावाचे कामही पूर्ण झाल्याने खेळाडूंसह शहरवासियांना जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध होणार होती. २५ जानेवारी रोजी पालकमंत्री शंभुराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या जलतरण तलावाचे लोकार्पणही झाले होते. सेमी आॅलिम्पिक म्हणजेच २५ मीटर लांबी व २१ मीटर रुंदी असलेला हा सुसज्ज जलतरण तलाव एका महिन्याच्या कालावधीत जनसेवेत येणे अपेक्षीत होते.
परंतू अद्याप हा जलतरण तलाव जनसेवेत येऊ शकला नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने जलतरण तलाव सुरू झाला नसल्याचे सांगितले जात आहे. या जलतरण तलाव परिसरातच लहान मुलांसही बेबीपूलची निर्मिती करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार आणि हा जलतरण तलाव केव्हा जनसेवेत येणार, याकडे वाशिमकरांचे लक्ष लागून आहे.
जलतरण तलावासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच जलतरण तलाव सुरू होणार आहे.
- प्रदीप शेटीये,
जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम