विनाकारण फिरणाऱ्यांची ‘ऑन द स्पॉट’ कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:43 AM2021-04-24T11:43:32+5:302021-04-24T11:43:41+5:30
‘On the spot’ corona test : नगरपालिका, महसूल व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवत २३ एप्रिल रोजी ९० जणांची रॅपिड अॅंटीजेन चाचणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : वारंवार सांगूनही शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची आता जागेवरच कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगरूळपीर येथे नगरपालिका, महसूल व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवत २३ एप्रिल रोजी ९० जणांची रॅपिड अॅंटीजेन चाचणी केली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांसह, पालिका प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन ही करीत आहे. मात्र, नागरिक काहीच देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत. शहरात सकाळी ७ ते ११ वाजता पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिली आहे. त्यामुळे सर्वत्र वर्दळ दिसून येते. त्यातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुपारी १२ वाजता नंतर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर कुणालाही फिरण्यास मज्जाव घातला आहे. तरीही अनेकजण शहरात फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांकडून इतरांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना चाचणी केली जात आहे. शुक्रवारी पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची रॅपिड अॅंटीजेन चाचणी केली. जवळपास ९० जणांची चाचणी केली. यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी उपविभागीय अधिकारी मुळे, नायब तहसीलदार कुुलकर्णी, ठाणेदार जगदाळे, आरोग्य निरीक्षक राजेश संगत नगरपरिषदेचे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अजमल, डॉ जाधव व कर्मचारी उपस्थित होते. चाचणी केल्यानंतर सर्वांचे नाव पत्ता, मोबाईल नंबर व आधार नंबर घेऊन त्यांना सोडून देण्यात आले