आदिवासी शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार तुषार संच ! २९ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 04:18 PM2019-06-13T16:18:13+5:302019-06-13T16:20:29+5:30
केंद्रवर्ती अर्थसंकल्प सन २०१८-१९ मध्ये न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत वनहक्क कायद्यांतर्गत जमीन प्राप्त झालेल्या आदिवासी लाभार्थ्यांना व सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर तुषार संच पुरवठा करण्याची योजना मंजूर झाली आहे.
वाशिम - केंद्रवर्ती अर्थसंकल्प सन २०१८-१९ मध्ये न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत वनहक्क कायद्यांतर्गत जमीन प्राप्त झालेल्या आदिवासी लाभार्थ्यांना व सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर तुषार संच पुरवठा करण्याची योजना मंजूर झाली आहे. अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अनुसूचित जमातीमधील इच्छुक शेतकरी लाभार्थ्यांनी १५ ते २९ जून २०१९ या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकाºयांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थींना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असावा. त्याच्याकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अपंग, विधवा, परित्यक्ता लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थ्याकडे दारिद्र्यरेषेचे कार्ड किंवा राशन कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जासोबत रहिवाशी दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जमीन धारणेचा सातबारा दाखला, आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. वैयक्तिक वनहक्क पट्टेधारक लाभार्थींना (आयएफआर होल्डर) प्राधान्य देण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विभागाकडून न मिळाल्याबाबतचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. पाण्याचे स्त्रोत विहीर, नाला, नदी असणे आवश्यक आहे. पाणी उपशाची साधने तेलपंप, वीजपंप असणे आवश्यक आहे. अर्जाचा विहित नमुना अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहे. पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी १५ जून ते २९ जून २०१९ या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकाºयांनी केले.