फवारणीसाठी बैलगाडीने न्यावे लागते पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:24 AM2017-08-12T01:24:41+5:302017-08-12T01:25:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: मागील २0 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून, यावर नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी शेतकरी करीत आहेत; परंतु शेतशिवारात पाणीच उपलब्ध नसल्याने शेतकरी बैलगाडीने गावातून पाणी नेऊन कीटकनाशकांची फवारणी करीत असल्याचे चित्र शिरपूर जैनसह मालेगाव परिसरात पाहायला मिळत आहे.
यंदाच्या मृग नक्षत्रात जोरदार हजेरी लावून शेतकर्यांना उत्साहित करणार्या पावसाने आता शेतकर्यांना रडकुंडीस आणले आहे. मागील २0 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे फुला, शेंगावर आलेली पिके संकटात सापडली आहेत. प्रामुख्याने सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांची स्थिती अत्यंत वाईट असून, या पिकांवर मोठय़ा प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे. आधीच पावसामुळे संकटात सापडलेल्या पिकांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी वर्ग पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत; परंतु ही कीटकनाशकांची फ वारणी करण्यासाठी शेतशिवारात पाणीच नसल्याने अनेक शेतकरी बैलगाडीने गावातून पाणी नेऊन फ वारणी करीत आहेत. मालेगाव तालुक्यात यंदाही मोठय़ा प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली असली तरी, यंदा मूग आणि उडिदाच्या पेर्यातही वाढ झालेली आहे. कमी कालावधीची असलेली ही पिके सद्यस्थिती फुला शेंगावर आली आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्यामुळे पीक उत्पादनात घट येण्याची भीती असताना या पिकांवर किडीनेही आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. किडीवर नियंत्रणासाठी फवारणी करावी, एवढेही पाणी शिवारातील ओढे, नाल्यांत नसल्यामुळे शेतकर्यांना गावातून बैलगाडीने पाणी न्यावे लागत आहे.