कलश यात्रेने श्री हनुमान रामकथेला प्रारंभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:58 PM2017-10-01T17:58:01+5:302017-10-01T17:58:06+5:30
वाशिम : स्थानिक शुक्रवारपेठ भागातील माहूरवेस येथील ज्ञानगंगा परिसरात हनुमान मंदिर येथे श्री श्री रविशंकर यांची शिष्या देवी वैभवीश्रीजी यांच्या अमृतवाणीतून १ ते ४ आॅक्टोंबरदरम्यान श्री हनुमान रामकथेचे आयोजन केले आहे. यानिमित्त १ आॅक्टोंबर रोजी स्थानिक मध्यमेश्वर मंदिर येथून नगर परिषद मार्गे शुक्रवापेठ, माहुरवेश पर्यत १०८ कलशधारी महिलांची कलशयात्रा काढण्यात आली. यामध्ये महिला व पुरूषांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
सर्वप्रथम मध्यमेश्वर मंदिर येथे देवी वैभवश्रीजींनी पुजाअर्चना केली. तदनंतर संस्थानच्या वतीने रंगनाथ पांडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून माताजींचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. हरिष बाहेती, डॉ. सरोज बाहेती, जमनादास बाहेती, सनदी लेखापाल बालकिसन बाहेती, डॉ. जयकिसन बाहेती, प्रविण बाहेती, राम बाहेती, गुड्डु बाहेती, व्दारकादास बाहेती, संदीप बाहेती, आर्ट आॅफ लिव्हींगचे विजय चव्हाण, अग्रवाल, अर्चना मेहकरकर, निलेश सोमाणी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. रस्त्यात ठिकठिकाणी भाविक भक्तांनी रांगोळी काढून माताजींचे स्वागत केले. यावेळी मुखेड येथील मित्रसंघ यांचा ४० लोकांचा ढोलपथक आकर्षणाचा केंद्र ठरला. सामाजिक कार्यकर्ते अनिल जाजु यांच्या पुढाकाराने या पथकाचे नगरीत आगमन झाले. या पथकातील प्रमुख असलेला अवघ्या ५ वर्षीय बालक कृष्णा जाजु याने सुध्दा ढोल वाजविले. सदर कथा १ आॅक्टोंबरपासून माहुरवेश ज्ञानगंगा परिसरात सुरु झाली असून २ आॅक्टोंबर रोजी श्रीराम व श्री हनुमान जन्म, ३ आॅक्टोंबर रोजी केवट, शबरी व श्री हनुमान भेट, ४ आॅक्टोंबर रोजी श्रीराम राज्यभिषेक याप्रसंगाचे गुणगाण व कथा होणार आहे. ३ आॅक्टोंबरला दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रोकडीया हनुमान प्रभातफेरी मंडळ शेलू यांच्या सानिध्यात संगीतमय १०८ श्री हनुमान चालिसापाठचे आयोजन करण्यात आलेले आहे. ५ आॅक्टोंबर रोजी सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत हनुमान मंदिराचा जिर्णोध्दार व पुन:स्थापना, दुपारी १ ते ४ महाप्रसाद व सायंकाळी ७ वाजेपासून सत्संग, ध्यानज्ञानचे आयोजन आहे. सदर कार्यक्रमाचा भाविकभक्तांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा व कलशयात्रेत महिलांनी कलश घेवून मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक बाहेती परिवाराने केले आहे.