श्रीनृसिंह सरस्वती संस्थानच्या विश्वस्तांची याचिका फेटाळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 07:19 PM2017-11-22T19:19:01+5:302017-11-22T19:22:00+5:30
कारंजा लाड येथील श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानचे अध्यक्ष, व्यवस्थापक, विश्वस्त, अंकेक्षक व सनदी लेखापाल आदिंविरूद्ध दाखल गुन्हे रद्द करावे, या मागणीसाठी टाकलेली याचिका नागपूर खंडपिठाने २१ नोव्हेंबर रोजी फेटाळल्याची माहिती न्यायमुर्ती एम.जे.गिराटकर, आर.के.देशमुख यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम): येथील श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानचे अध्यक्ष, व्यवस्थापक, विश्वस्त, अंकेक्षक व सनदी लेखापाल आदिंविरूद्ध दाखल गुन्हे रद्द करावे, या मागणीसाठी टाकलेली याचिका नागपूर खंडपिठाने २१ नोव्हेंबर रोजी फेटाळल्याची माहिती न्यायमुर्ती एम.जे.गिराटकर, आर.के.देशमुख यांनी दिली.
कारंजा येथील श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानमध्ये ३६ कोटी ३७ लक्ष ७९ हजार ८३३ रूपयांची अफरातफर झाल्याची तक्रार कारंजा लाड येथील शेखर पुरूषोत्तम काण्णव यांनी कारंजा शहर पोलिस स्टेशनला ३१ मे २०१५ रोजी दाखल केली होती. त्यावरून पोलीसांनी संस्थानचे अध्यक्ष नारायण खेडकर, व्यवस्थापक वसंत सस्तकर, उमाकांत पांडे, श्रीपाद पळसोकर, प्रकाश घुडे, अंकेक्षक सुभाष मुंगी, संस्थेचे सनदी लेखापाल संजय खांडेकर आदिंविरूध्द कलम ४२०, ४६५, ४६८, ४०८, ४७१ व ३४ भादंविनुसार गुन्हे दाखल केले. त्याविरूध्द गुरूमंदीर संस्थान अध्यक्ष, व्यवस्थापक व विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात ‘क्रिमीनल अॅप्लीकेशन अेपीएल नं. ३६९ आॅफ २०१५’ अन्वये १५ जून २०१५ रोजी पोलीस स्टेशन अधिकारी, कारंजा, शेखर पुरूषोत्तम काण्णव, अनंत गजानन आठल्ले, प्रमोद दहिहांडेकर, गजानन जोशी यांच्याविरूद्ध याचिका सादर करून पोलीसांनी दाखल कलेले सर्व गुन्हे रद्द करावे, अशी मागणी केली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने अभियोक्ता फिरदोस मिर्झा, ए.एस.देशपांडे; तर सरकारी पक्षाच्यावतीने सहा. सरकारी अभियोक्ता व्हि.पी.गणगणे आणि विरूध्द पक्षाच्यावतीने अभियोक्ता श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, न्यायमुर्ती एम.जे.गिराटकर व न्यायमुर्ती आर.के.देशपांडे यांनी दोन्ही पक्षांसह सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आलेला युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर १४ नोव्हेंबर २०१७ रोजी याचिकेचा निकाल राखून ठेवला होता. त्याचा निर्णय २१ नोव्हेंबर रोजी देण्यात आला. त्यानुसार, श्रीगुरूमंदीर संस्थानच्यावतीने दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता यापुढे श्रीनृसिंह सरस्वती संस्थानचे विश्वस्त मंडळाने संगनमत करून देवस्थानला मिळालेल्या देणगीच्या रक्कमेत अफरातफर केल्याच्या तक्रारीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम करण्यास मोकळे झाले आहेत.