अकोला-मंगरुळपीर बस खड्ड्यात उलटली; प्रवासी किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 05:00 PM2019-08-20T17:00:58+5:302019-08-20T17:25:06+5:30
महामंडळाची बस शेलूबाजार गावानजीक रस्त्यावरून खाली घसरत खड्ड्यात उलटली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार (वाशिम) : अकोल्यावरुन मंगरूळपीरकडे जाणारी एम. एच. ४०, ८८७७ क्रमाकांची महामंडळाची बस शेलूबाजार गावानजीक रस्त्यावरून खाली घसरत खड्ड्यात उलटली. २० आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजातदरम्यान घडलेल्या या अपघातात एक प्रवासी किरकोळ जखमी असून अन्य २३ प्रवासी सुखरूप आहेत.
शेलूबाजार ते अकोला रस्त्याचे काम सुरु असून एका बाजूने वाहतूक सुरु आहे. रस्त्यावर दगड असून खड्डेही आहेत. दगड व खड्डे टाळण्यासाठी वाहने नागमोडीप्रमाणे धावतात. २० आॅगस्ट रोजी एमएच ४०, ८८७७ क्रमांकाची बस अकोल्यावरून मंगरूळपीरकडे जात असताना, एका टँकरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही बस रस्त्यावरून खाली घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बसचा वेग नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघातात एक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. २४ प्रवाशांमध्ये एक दीड महिन्याचे बालकही होते. एका प्रवाशाचा अपवाद वगळता उर्वरीत २३ प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला कोणतीही नोंद नाही.