अपघात विरहित सेवा देणाऱ्या एसटी चालकांना आता बक्षीस नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:46 PM2020-06-15T17:46:34+5:302020-06-15T17:46:54+5:30
ही योजना बंद करण्यात आली असून, सर्व विभागस्तरावर या निर्देशाची अंमलबजावणी करण्याच्या सुचना १० जून रोजी देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचालकांना पूर्वी २६० दिवस अपघात विरहित सेवा दिल्यानंतर बक्षीस देण्याची योजना महामंडळाकडून राबविण्यात येत होती. आता ही योजना बंद करण्यात आली असून, सर्व विभागस्तरावर या निर्देशाची अंमलबजावणी करण्याच्या सुचना १० जून रोजी देण्यात आल्या आहेत.
एसटीला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे खरे काम वाहक-चालक करतात, त्यामुळे त्यांना एसटीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हटले जाते. विशेषत: म्हणजे देशभरातील सार्वजनिक परिवहन सेवेत एसटीच्या अपघाताचा दर सर्वाधिक कमी आहे. १ लाख किलोमीटर अंतरावर ०.१३ अपघात असा एसटीचा दर आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या पुरस्काराचे खरे मानकरी एसटीचे ३४ हजार चालक आहेत. एसटी महामंडळाकडून २६० दिवस अपघात विरहित सेवा देणाºया चालकांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येत होते. एसटी चालकांना १५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारीला हे बक्षीस देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जात होता. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रादूभार्वामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना आखल्या जात आहेत. लाूॅकडाऊनमुळे एसटीच्या महसुलात लक्षणीय घट झाल्याने खर्चात काटकसर करून खर्च पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे ही अपघात विरहित बक्षीस योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. म.रा.मा.प. संचालक मंडळाची २९१ वी बैठक संपन्न झाली असून या बैठकीत एसटीच्या चालकांना २६० दिवस अपघात विरहित सेवेबाबत देण्यात येणारे बक्षीत योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.