एसटी कर्मचा-यांना बदलीसाठी ठिकाण निवडण्याची मुभा
By admin | Published: March 25, 2017 02:28 AM2017-03-25T02:28:16+5:302017-03-25T02:28:16+5:30
तीन ठिकाणांसाठी पसंती क्रम देता येईल!
वाशिम, दि. २४- राज्य परिवहन महामंडळात कार्यरत वर्ग ३ कर्मचार्यांच्या बदल्यांसंदर्भात धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार एखाद्या पदावर ३ वर्षांंचा कालावधी पूर्ण करणार्या कर्मचार्यांची बदली करताना संबंधित कर्मचार्याला प्रशासकीय सोय विचारात घेऊन पसंतीनुसार ठिकाण निवडण्याचा अधिकार असणार आहे. या संदर्भातील परिपत्रक २२ मार्च रोजी जारी करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) ३ मे २0१४ रोजीच्या त्यांच्या परिपत्रकानुसार महामंडळातील अधिकारी / कर्मचार्यांच्या बदल्यासंबंधातील धोरण निश्चित करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. सदर परिपत्रकातील सूचनेनुसार राज्य संवर्गीय कर्मचार्यांच्या नियतकालिक बदल्या करण्याबाबत महामंडळाच्या १0 एप्रिल २0१५ च्या परिपत्रकात सूचना देण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या परिपत्रकातील नमूद सूचनानुसार महामंडळाच्या वर्ग ३ राज्य संवर्गातील कर्मचार्यांसाठी एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षांंचा असेल. त्यानंतर त्याची बदली मार्च/एप्रिल महिन्यात करण्यात येईल. यासाठी सक्षम प्राधिकारी मार्च/ एप्रिलमध्ये पात्र होतील. अशा कर्मचार्यांची यादी डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात येईल. बदली पात्र कर्मचार्यांकडून तीन ठिकाणांसाठी पसंतीक्रम मागविण्यात येईल. तसेच त्यांची बदली करताना प्रशासकीय सोय विचारात घेऊन पसंती क्रमाचा विचार करण्यात येईल. एखाद्या ठिकाणासाठी एकापेक्षा अधिक कर्मचार्यांकडून पसंती क्रम प्राप्त झाल्यास अशा प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार आहे. नियतकालिक बदल्यांसंदर्भात महामंडळाच्या परिपत्रकाची माहिती आहे. या परिपत्रकानुसार महामंडळातील वर्ग ३ कर्मचार्यांच्या
नियतकालिक बदल्या करताना तीन ठिकाणांसाठी पसंतीक्रम मागवावा लागणार आहे.
-सचिन भा. क्षीरसागर
विभागीय वाहतूक अधिकारी
अकोला