पाणीटंचाईमुळे खालावतोय मार्गांच्या कामाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 03:13 PM2019-06-04T15:13:31+5:302019-06-04T15:13:45+5:30
जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील दळणवळण सुविधा अद्ययावत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांसह काही जिल्हामार्गांची कामे करण्यात येत आहेत; परंतु जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे. खडी, मुरूम या गौणखनिज त्यामुळे उघडे पडत असून, याचा त्रास वाहनधारकांना होत आहे.
जिल्ह्यात वाशिम-कारंजा, महान-मानोरा, कारंजा-मानोरा, मालेगाव-मेहकर हे राष्ट्रीय महामार्ग, तसेच शेलुबाजार ते वाशिमसह काही जिल्हा मार्गांचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे; परंतु जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक प्रकल्पांत ठणठणाट असल्याने जनतेचीच तहान भागणे कठीण झाले आहे. त्यामुळे मार्गाच्या कामासाठी पाणी आणावे कोठून हा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय महामार्गांची कामे रासायनिक द्रव्याच्या वापराने होत असल्याने या कामांत पाण्याची आवश्यकता खूप कमी आहे; परंतु या मार्गासाठीचे समतलीकरण आणि जिल्हा मार्गाच्या समतलीकरण प्रक्रियेत गौणखनिजाची योग्य दबाई करणे आवश्यक असून, यासाठीच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या अडचण ठरत आहे. त्यामुळे रस्त्यावर खडी, मुरूम उघडा पडत आहेच शिवाय मोठ्या प्रमाणात धुळही उडत आहे. याचा त्रास वाहनधारक आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे; परंतु आवश्यक प्रमाणात पाणीच नसल्याने ही समस्या दूर करून कामांचा दर्जा सुधारावा कसा, असा प्रश्न कंत्राटदारांनाही पडला आहे.