गणवेश, पाठ्यपुस्तकाविनाच शैक्षणिक सत्राला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:17+5:302021-07-02T04:28:17+5:30
भर जहागीर परिसरात भर जहागीर व मोप केंद्रांतर्गत अनुक्रमे भर जहागीर मराठी, उर्दू, कुऱ्हा, जवळा, मांडवा, मोहजाबंदी, मांगवाडी, मोरगव्हाण, ...
भर जहागीर परिसरात भर जहागीर व मोप केंद्रांतर्गत अनुक्रमे भर जहागीर मराठी, उर्दू, कुऱ्हा, जवळा, मांडवा, मोहजाबंदी, मांगवाडी, मोरगव्हाण, वाडी, शिवाजी विद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय मांडवा, तर मोप केंद्रांतर्गत मोप, लोणी, बु, लोणी खु, आसोला, बोरखेडी, शेलुखडशे, कन्हेरी, चाकोली अशा प्रकारे २० शाळांतर्गत शेकडो विद्यार्थी येतात. शिक्षण विभागांतर्गत प्रत्येक शैक्षणिक सत्राआधीच विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार, पुस्तके, गणवेशाची जय्यत तयारी केली जाते. मागील सत्रात शालेय पोषण आहार, पुस्तके आणि गणवेशाची वेळीच व्यवस्था करण्यात आली होती; परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शिक्षण विभागाची कार्यपद्धती ढेपाळल्याचे दिसत आहे. विविध गावांतर्गत शिक्षकांना विद्यार्थी गृहभेट देताना विद्यार्थ्यांसह पालकवर्ग वरील बाबीसंदर्भात विचारणा करतात.
------------
विद्यार्थ्यांत शाळेची ओढ
२८ जूनपासून शाळा उघडल्याने विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागलेली दिसते. गावातील शाळा उघडी दिसल्याने अनेक विद्यार्थी शाळेभोवती येरझऱ्या घालत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे गृहभेटी देताना शिक्षकांची मोठी गोची होत आहे. कारण मागील सत्रात ऑनलाईन शिक्षणावर भर दिल्याने बहुतांश विद्यार्थ्याकडे एकाही विषयाचे पुस्तक चांगल्या अवस्थेत राहिले नाही. त्यातच कोरोना विषाणूमुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचा फायदा मिळाला नाही.
कोट : नुकताच शाळेला प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांनी गत सत्रातील जुन्या पुस्तकांचा ज्ञानार्जनासाठी वापर करावा आणि शिक्षकांनी गृहभेटी देण्यावर भर देणे आवश्यक आहे.
-संतोष भिसडे (केंद्रप्रमुख भर जहागीर)