अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; २७ दिवस चालणार प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 04:10 PM2020-08-18T16:10:50+5:302020-08-18T16:11:05+5:30

जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २१ हजार ८४० जागा उपलब्ध असल्याने जागांचा तुटवडा नाही.

Start the eleventh admission process; The process will take 27 days | अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; २७ दिवस चालणार प्रक्रिया

अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; २७ दिवस चालणार प्रक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया १७ आॅगस्टपासून सुरू झाली असून, ही प्रक्रिया १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १९ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २१ हजार ८४० जागा उपलब्ध असल्याने जागांचा तुटवडा नाही.
गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही इयत्ता अकरावीतील प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने न होता शाळास्तरावरच होणार आहे.  यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने सर्वच क्षेत्राला याचा फटका बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटले नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,  कनिष्ठ महाविद्यालयांनी शक्यतोवर प्रवेश प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीचा वापर करावा, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिल्या. आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज व संबंधित कागदपत्रे घेऊन प्रवेश निश्चित करावा, अकरावी प्रवेशासाठी नियमानुसार असलेले शुल्क आॅनलाईन माध्यमाद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास फिजिकल डिस्टन्सिंग व कोविड-१९ याबाबत शासनाने घालून दिलेले निकष पाळत टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना बोलावून प्रवेश द्यावे, प्रवेश प्रक्रियवेळी शाळेत गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना मानकर यांनी दिल्या. कला, वाणिज्य , विज्ञान व संयुक्त शाखांच्या प्रवेशांसाठी दहावी परीक्षेतील किमान गुणांची कोणतीही अट नाही, प्रवेश घेताना काही अडचण उद्भवल्यास विद्यार्थी व पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मानकर यांनी केले. गुणवत्तेच्या आधारावर ही प्रवेश प्र्रक्रिया राबविली जाणार असून अनुदानित माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणत्याही वर्गाच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये, अशा सूचनाही मानकर यांनी दिल्या.


अशा आहेत शाखानिहाय प्रवेशित जागा
जिल्ह्यात अनुदानित ८०, विनाअनुदानित ६१, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित २६ असे एकूण १६७ कनिष्ठ महाविद्यालये आहेत.यामध्ये अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात ८८८० जागा, विनाअनुदानित महाविद्यालयात ८९६० जागा, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयात चार हजार जागा उपलब्ध आहेत. कला शाखेसाठी १०८८०, विज्ञान शाखेसाठी ९४४०, वाणिज्य शाखेसाठी ६४० तर अन्य शाखेसाठी ८०० जागा आहेत.

Web Title: Start the eleventh admission process; The process will take 27 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.