बचत गटाच्या वस्तू प्रदर्शनाला प्रारंभ
By admin | Published: March 25, 2017 02:26 AM2017-03-25T02:26:42+5:302017-03-25T02:26:42+5:30
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन; जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले मार्गदर्शन.
वाशिम, दि. २४- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी थाटात करण्यात आले. यावेळी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्याशिवाय सामाजिक व राजकीय सक्षमीकरण होणे शक्य नाही. त्यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बचत गटाची चळवळ व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख ह्या होत्या. जि. प. चे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, समाजकल्याण सभापती पानुताई जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, श्रीमती वानखेडे, वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महिला सक्षमीकरणावर मार्मिक भाष्य केले. कायद्याच्या बडग्यामुळे महिलांचा राजकीय क्षेत्रात शिरकाव झाला खरा पण, तो केवळ नामधारी स्वरूपाचा. अनेक महिलांचा कारभार त्यांचे पती अथवा वडील पाहताना निदर्शनास येत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त केले. महिलांच्या विकासासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उभारण्यात आलेली दुकाने सध्या बंद पडली आहेत. काही ठिकाणी नादुरुस्त आहेत.
ते दुरुस्त करुन महिलांना उपलब्ध करुन दिल्यास महिलांना रोजगाराची संधी निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. लोणचे, पापड, कुरडई आदि पारंपरिक व्यवसाय सोडून महिलांनी कुक्कुट पालन, बकरीपालन असे नवीन व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. सभापती विश्वनाथ सानप यांनीही यावेळी विचार मांडले. हर्षदा देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. महिलांनी आर्थिक सूत्रे आपल्या हातात घेतल्यास महिला सक्षमीकरणासह कौटुंबिक समतोलही राखला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधीक्षक मुकुंद नायक यांनी मानले.