शासनाच्या तूर खरेदीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:37 AM2017-07-27T02:37:12+5:302017-07-27T02:41:40+5:30
वाशिम : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शासनामार्फत टोकन वाटप करण्यात आलेल्या शेतकºयांची तूर ३१ आॅगस्टपर्यंत खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शासनामार्फत टोकन वाटप करण्यात आलेल्या शेतकºयांची तूर ३१ आॅगस्टपर्यंत खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, अनसिंग, मालेगाव व कारंजा येथील बाजार समित्यांमधील केंद्रांवर तूर खरेदीस बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज वाशिम येथील खरेदी केंद्रांना भेट देऊन तुरीच्या खरेदी प्रक्रियेची माहिती घेतली व तूर खरेदीच्या अनुषंगाने सूचना दिल्या. यावेळी जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी शेतकºयांची तूर शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्याची योजना ३१ मे पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या कालावधीत तूर खरेदी पूर्ण न झाल्याने शासनाने शेतकºयांकडे असलेल्या पेरेपत्रकानुसार उपलब्ध असलेल्या तूर शेतमालाची नोंद करून टोकन वाटप केले होते. तसेच १० जून २०१७ पर्यंत तूर खरेदी सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, तरीही टोकन वाटप केलेल्या शेतकºयांची तूर शिल्लक राहिल्याने शासनाने टोकन वाटप करण्यात आलेल्या सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यास २१ व २६ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी दिली आहे.
ज्या शेतकºयांनी तूर शेतमालाची नोंदणी करून टोकन प्राप्त केले असेल, त्यांच्याकडे असलेल्या तूर साठ्याची पडताळणी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्राम सचिव यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामार्फत तूर साठ्याची पाहणी करण्यात येणार आहे. टोकनधारक शेतकºयांनी स्वत:चीच तूर विक्रीसाठी आणावी. शेतकºयांच्या टोकनवर व्यापाºयांची तूर विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.