पूरबाधितांचे अन्नत्याग आंदाेलनास प्रारंभ; बेलाेरा येथील मंदिरात आंदाेलन
By नंदकिशोर नारे | Published: July 26, 2023 02:07 PM2023-07-26T14:07:20+5:302023-07-26T14:07:44+5:30
या आंदाेलनामध्ये गावकऱ्यांचा माेठया प्रमाणात सहभाग असून महिलाही यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत
वाशिम : अतिवृष्टी आणि खोराडी नदीच्या महापुराचे पाणी मानाेरा तालुक्यातील बेलोरा व विठोली गावात शिरल्याने घरातील अन्न धान्य, कापूस, सोयाबीन व शेतीसाठी आणलेले खत पाण्यात भिजून विस्कळीत जनजीवनाला पूर्वपदावर आणण्यासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत व बेलोरा येथे पूर संरक्षण भिंतीची बांधणी करावी, या मागणीसाठी परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी नेते मनोहर राठोड व गावकऱ्यांच्यावतीने २६ जुलै पासून गावातील कृपागीर महाराज मंदिरात अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
या आंदाेलनामध्ये गावकऱ्यांचा माेठया प्रमाणात सहभाग असून महिलाही यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत. पन्नास घरांची लोकवस्ती असणाऱ्या बेलोरा गावालगत वाहणारी खोराडी नदी असून या नदीमुळे गावकऱ्यांना महापुराचा अनेक वेळा फटका बसलेला आहे. महापुराच्या संरक्षणासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे संरक्षण भिंतीची मागणी केली; परंतु आमच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. याकरिता त्वरित खोराडी नदीच्या तीरावर संरक्षण भिंत निर्माण करून प्रति घराला २५ हजार रुपये आर्थिक मदत देऊन शेतीची नुकसान भरपाई देण्याची मागणी जोपर्यंत शासन पूर्ण करणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदाेलनकर्ते यांनी घेतला आहे. आंदाेलनात परिवर्तन शेतकरी संघटनेचे नेते मनाेहर राठाेड यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. या आंदाेलनाकडे मानाेरा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले दिसून येत आहे.