उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ
By admin | Published: December 9, 2015 02:48 AM2015-12-09T02:48:35+5:302015-12-09T02:48:35+5:30
मानोरा व मालेगाव नगर पंचायत निवडणूक.
मालेगाव/मानोरा : मालेगाव व मानोरा नगर पंचायत निवडणुकीत भाग्य आजमाविणार्या इच्छुक उमेदवारांना १0 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. १0 ते १७ डिसेंबरदरम्यान उमेदवार अर्ज वाटप आणि स्वीकारण्याचा कार्यक्रम असून, १0 जानेवारी २0१६ रोजी मतदान होणार आहे. गत महिन्याभरापासून मालेगाव व मानोरा येथील राजकीय क्षेत्रातील दिग्गजांना निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय घडामोडींनी वेग घेतला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला १0 डिसेंबरपासून प्रारंभ होत असून, १७ डिसेंबरपर्यंंत अंतिम मुदत आहे. सुट्टीचे दिवस असल्याने १२ व १३ डिसेंबरला उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारणे बंद असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितले. १0 जानेवारी २0१६ रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंंत मतमोजणी होणार असून, ११ जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मालेगाव व मानोरा येथील राजकीय वातावरण थंडीच्या दिवसातही चांगलेच तापले असल्याचे दिसून येते. मालेगावातील काही स्थानिक नेते आघाडी करण्याच्या मानसिकतेत असल्याने प्रमुख पक्षांसमोर आव्हान उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. मानोर्यात आमदार राजेंद्र पाटणी, माजी मंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार प्रकाश डहाके, भारिप-बमसंचे युसूफ पुंजानी, माजी सभापती हेमेंद्र ठाकरे, जि.प. सदस्य रणजित जाधव यांच्यासह स्थानिक आघाड्यांनी वातावरण तापविले.