वरदरी बु. ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 03:53 PM2018-11-04T15:53:46+5:302018-11-04T15:54:27+5:30
वरदरी बु. येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव मन्नु आडे यांच्या अपात्रतेला विभागीय आयुक्त अमरावती यांच्या २ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये स्थगीती मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी वाशीम यांच्या न्यायालयाने अपात्र ठरविलेल्या मालेगाव तालुक्यातील वरदरी बु. येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव मन्नु आडे यांच्या अपात्रतेला विभागीय आयुक्त अमरावती यांच्या २ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये स्थगीती मिळाली आहे.
आडे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी गंगाधर राठोड यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २९ आॅक्टोबर रोजी सुनावणी देताना जिल्हाधिकाºयांनी अपात्र ठरविले होते. या आदेशाविरुध्द आडे यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १६ (२) नुसार दाद मागणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या निर्णयास अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती दिली. या प्रकरणाची सुनावणी पुढील २७ नोव्हेंबरला ठेवली आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे साहेबराव आडे यांना तुर्त दिलासा मिळाला आहे.