राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:35 AM2021-07-19T11:35:13+5:302021-07-19T11:35:41+5:30
State government employees waiting for transfer: वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची यावेळी तरी बदली होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली विविध विभागांची प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले असून, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची यावेळी तरी बदली होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने ३० जूनपर्यंत विविध शासकीय विभागांमधील बदली प्रक्रियेस स्थगिती दिली होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रशासकीय बदली प्रक्रियेस शासनाने हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यानुसार १४ ऑगस्टपर्यंत सर्व बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. सर्वसाधारण बदल्या एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के करण्यात याव्यात, या बदल्या करताना ज्यांचा संबंधित पदावर कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांचा प्राधान्याने विचार करावा. सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावी, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशेष कारणास्तव रिक्त पदांवर १ ते १४ ऑगस्ट या कालावधीत बदली प्रक्रिया राबवावी, या अंतर्गत फक्त १० टक्के कर्मचाऱ्यांच्याच बदल्या करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुळे रखडलेली बदली प्रक्रिया आता वेग घेणार आहे. या बदली प्रक्रियेत महसूल, जिल्हा परिषद आदी विभागांचा समावेश आहे. जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यालयात काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून आहेत. या कर्मचाऱ्यांची यंदाच्या प्रक्रियेत बदली होणार का? याकडे इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
(प्रतिनिधी)