आजपासून राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:24 AM2017-10-12T01:24:12+5:302017-10-12T01:25:48+5:30
वाशिम: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी कळविले आहे.
उद्घाटन कार्यक्रमास गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अमरावतीच्या क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये १४ वर्षे, १७ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुली व मुलांचे ८ विभागाचे व क्रीडा प्रबोधनी यांचा प्रत्येकी एक संघ असे एकूण ५४ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघात १२ खेळाडूंचा समावेश असून, त्यांच्यासोबत एक संघ व्यवस्थापक उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पांडे यांनी कळविले आहे.