‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या नागरिकांना ‘एसटी’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:27 PM2020-05-08T17:27:04+5:302020-05-08T17:27:41+5:30
नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सेवा देणार आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी शासनाने केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे विविध जिल्ह्यात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सेवा देणार आहे. तथापि, शासन निर्देशांच्या आणि अटींच्या अधीन राहून रितसर संबंधित जिल्हा प्रशासन, परिवहन अधिकारी, पोलिसांकडे परवानगी घेऊन नोंदणी करणाऱ्या लोकांसाठीच ही सेवा राहणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन जारी केले आहे. परिणामी, नोकरी, शिक्षण व अन्य कारणांमुळे राज्याच्या विविध भागांत नागरिक अडकून पडले आहेत. सदर नागरिकांना ईच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी आणि शर्तीवर परवानगी दिली आहे. अशा नागरिकांची वाहतूक करण्याची तयारी राज्य परिवहन मंडळाने केली आहे. उपरोक्त नागरिकांची वाहतूक करताना विभागीय पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून, शासनाच्या महसूल, पोलीस विभागासह परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून प्रवासाबाबात मागणी नोंदविली असली तर त्याची माहिती घेऊनच एसटी प्रवासाची सोय केली जाणार आहे.
त्याशिवाय प्रवास करू इच्छिणाºया नागरिकाला शासनाने विहित केलेल्या प्रवासास अनुमती दिल्याबाबत सक्षम प्राधिकाºयाचे प्रमाणपत्र, तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र केल्यानंतर त्याची पडताळणी करून प्रवासमार्गाची माहिती घेतली जाणार आहे. प्रवास करू इच्छिणाºया नागरिकांच्या प्रवासमार्गाची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी सोडावयाच्या बससाठी आवश्यक संख्येचा प्रवासी गट तयार करूनच बस सोडली जाणार असून, ठरलेल्या प्रवासमार्गात सुरुवातीच्या ठिकाणानंतर शेवटच्या ठिकाणीच बस थांबवून प्रवासी उतरविले जातील. मधल्या ठिकाणी कोणताही प्रवासी उतरविला जाणार नाही.