उपअभियंत्यांच्या खुर्चीला दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:30+5:302021-07-15T04:28:30+5:30
रिसोड ते मेहकर या राज्य महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. इतरही रस्त्यांसंदर्भात तक्रारी आहेत. मात्र, या तक्रारींची दखल ...
रिसोड ते मेहकर या राज्य महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. इतरही रस्त्यांसंदर्भात तक्रारी आहेत. मात्र, या तक्रारींची दखल घेण्यात येत नाही, असा आरोप करीत बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सय्यद अकिल यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले असता, तेथे उपअभियंता आढळून आले नाही. संताप अनावर झालेल्या पदाधिकाऱ्यांनी शेवटी उपअभियंत्यांच्या खुर्चीलाच निवेदन देत रोष व्यक्त केला. रिसोड ते मेहकर राज्य महामार्गाचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी करूनही प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. खुर्चीला निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अकिल, महिला जिल्हाध्यक्षा प्रमिला शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा रंगनाथ धांडे, युवा नेते अनिल गरकळ, जिल्हा सल्लागार रवींद्र मोरे, माजी तालुका अध्यक्ष केशवराव सभादिंडे, तालुका विधी सल्लागार अॅड. दशरथ मोरे, तालुका कार्याध्यक्ष अॅड. तुरूकमाने, सुखदेव शिरसाठ, अलियार खान, विश्वनाथ पारडे आदींची उपस्थिती होती.
०००
२२ जुलै रोजी रास्ता रोको !
रिसोड ते मेहकर या रस्त्यासंदर्भात यापूर्वीदेखील ९ जुलैला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु, जि.प. पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने व बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित केले. परंतु, अद्याप ठोस कार्यवाही नसल्याने २२ जुलै रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.