गायनाच्या कार्यक्रमाचे थेट सौदी अरेबियावरून निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:54+5:302021-05-24T04:39:54+5:30
संस्कारशील कुटुंबासोबत राष्ट्राच्या सक्षम उभारणीत महिलांचा सहभाग असावा, यासाठी राष्ट्रसेविका समिती कार्यरत आहे. कोरोना संसर्गाच्या संकटकाळातदेखील राष्ट्रसेविका समितीच्या वाशिम ...
संस्कारशील कुटुंबासोबत राष्ट्राच्या सक्षम उभारणीत महिलांचा सहभाग असावा, यासाठी राष्ट्रसेविका समिती कार्यरत आहे. कोरोना संसर्गाच्या संकटकाळातदेखील राष्ट्रसेविका समितीच्या वाशिम शाखेतर्फे विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. कोरोनामुळे सध्याचा प्रसंग बिकट असला तरी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांना स्वतःसोबतच कुटुंबाचे आरोग्य जपावे लागते. घरातील वातावरण हसत-खेळत ठेवण्याची मोठी कसरत करावी लागते. त्यातून ओढवणारा ताण दूर व्हावा, याकरिता राष्ट्रसेविका समितीच्या वतीने ‘विरंगुळा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सात दिवस विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. ज्येष्ठ व्याख्याते व राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. राम रोडे यांचे गत सोमवारी व्याख्यान झाले. मंगळवारी विवेक जोशी यांचा ‘विनोद व चुटकुले’ हा हास्यकल्लोळ कार्यक्रम झाला, सुगम गायन कार्यक्रमात पूजा कावरे यांच्या सुमधुर गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे निवेदन सौदी अरेबियातील मधुरा कुलकर्णी यांनी केले. ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ हे एक पात्री नाटक ममता कुलकर्णी यांनी गुरुवारी सादर केले. शुक्रवारी सुप्रिया पांडे यांचे काव्यवाचन झाले. किशोर पुराणिक यांनी शनिवारी ‘मोगलाई धमाल’ हा कार्यक्रम सादर केला, तर रविवारी ‘कोरोना : समज व गैरसमज’ या विषयावर डॉ. अंजली कवठाळकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.